गुगल क्रोम ओएस (Chrome OS) - गुगलचे ब्रम्हास्त्र !

[ MARATHI ].......

गुगलकाकांनी अखेर हुकुमाचा एक्का काढलाय. कालच आपण मायक्रोसॉफ्टच्या विंडोज लाइव्ह प्लॅनेट.कॉम या ऑर्कुटच्या स्पर्धक साइट विषयी बोललो. बिंग.कॉम आणि विंडोज लाइव्ह प्लॅनेट.कॉम च्या यशामुळे मायक्रोसॉफ्ट शर्यतीत परतली आहे असे वाटु लागले होते मात्र गुगलने सात जुलै रोजी केलेल्या गुगल क्रोम ऑपरेटींग सीस्टमच्या घोषणेने खरेतर मायक्रोसॉफ्टची हवाच काढुन टाकली आहे असे म्हणायला हरकत नाही.

केवळ नउ महीन्यांपुर्वीच गुगलने आपला क्रोम नावाचा वेब ब्राउजर बाजारात आणला होता. (क्रोम मोफत उपलब्ध असल्याने "बाजारात आणला" असा उल्लेख कदाचीत चुकीचा ठरेल!) अवघ्या नऊ महीन्यांतच क्रोमने ऑपेरा आणि सफारी अशा मातब्बर ब्राउजर्सना मागे टाकले आहे. जगभर सुमारे ३० दशलक्ष संगणक क्रोम वापरणे पसंद करतात. गुगलच्या मते क्रोम ब्राउजर त्यांनी इंटरनेट लाइफस्टाइल जगणार्‍यांसाठी बनवीला आहे. मात्र हा ब्राउजर ज्या ऑपरेटींग सीस्टमवर काम करतोय ती मात्र अशा काळात बनवीली गेली आहे जेव्हा इंटरनेट लाइफस्टाईल हा शब्द देखील अस्तीत्वात आला नव्हता. आणि त्याचसाठी गुगलने घोषणा केली आहे ती गुगल क्रोम ऑपरेटींग सीस्टम बनवीण्याची.

स्पीड, सिंपलीसीटी आणि सेक्युरीटी या तीन गोष्टी लक्षात ठेवुन क्रोम ओएस (Chrome OS) बनवीण्यात येणार आहे. जुलै २०१० च्या आसपास क्रोम ओएस उपलब्ध होइल. सुरुवातीला फक्त नेटबुक पुरता मर्यादीत ठेवुन काही काळानंतर इतरत्र उपलब्ध करण्यात येइल. मुख्य म्हणजे इतर गुगल सर्वीसेस प्रमाणेच क्रोम ओएस वापरण्यास अतीशय सोपी असणार आहे. संगणक चालु केल्यावर तत्काळ चालु होणारी, जलद आणि वापरण्यास अतीशय सोपी अशी क्रोम ओएस ओपन सोर्स (Open Source) असणार आहे. म्हणजेच क्रोम ओएस चा प्रोग्रामींग कोड सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. जगभरचे प्रोग्रामर्स यामध्ये बदल करु शकतात, नविन सुविधा उपल्ब्ध करु शकतात आणि आपापल्या गरजेनुसार यात सुधारणा देखील करु शकतात.

गुगलने अतीशय चपखल शब्दात क्रोम ओएस ची गरज का आहे ते सांगीतलय. थोडक्यात त्यांनी मायक्रोसॉफ्ट ओएस च्या त्रुटी ओळखुन त्यावर मात करणारी क्रोम ओएस बनवीली आहे. गुगलच्या मते संगणक वापरणार्‍या लोकांच्या मागण्या काहीशा अशा आहेत -
"संगणकांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. लोकांना इमेल पाहण्यासाठी , वेब सर्फींग करण्यासाठी चुटकीसरशी चालु होणारे अति जलद संगणक हवे आहेत. संगणक चालु केल्यनंतर बूट (Booting time - ऑपरेटींग सीस्टम चालु होण्यासाठी वेळ) होइपर्यंत वाट बघायला कोणालाच वेळ नाही. वेळोवेळी फाइल्सचा बॅकअप घ्यायचा, संगणकावर वेगवेगळ्या सेटींग करायचा, व्हायरस पासुन बचाव करण्यासाठी स्कॅनींग करत रहायचं, सॉफ्टवेअर्स अपडेट करत रहायचे या सगळ्या गोष्टींचा त्रास आता कोणालाही घ्यायचा नाही आहे"

या सर्व मागण्या लक्षात घेउन बनवीलेली आणि अवघ्या वर्षभरात येउ घातलेली क्रोम ओएस म्हणजे मायक्रोसॉफ्ट च्या जिव्हारी घाव करणारे ब्रम्हास्त्रच म्हणावे लागेल. या स्पर्धेत टीकुन राहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट काय आणि कसा पलटवार करते हे पाहणे अतीशय रंजक ठरेल. या दोघात काहीही होउदे , आपण मात्र संगणक वापराच्या एका नव्या दुनीयेत प्रवेश करणार हे नक्की! आणि गुगलची ही खेळी यशस्वी झाली तर आणखी दहा वर्षांनी कोणी "मायक्रोसॉफ्ट म्हणजे काय रे भाउ?" असे विचारल्यास आश्चर्य वाटावयास नको.

( आणखीन एक, मायक्रोसॉफ्टला मात देण्यासाठी गुगलने क्रोम ओएसची खेळी खेळली हे जरी खरे असले तरी याच दगडात गुगलने आणखीन एक पक्षी मारायचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅपल कंप्युटर्सला देखील क्रोम ओएस ने चांगलाच इंगा दाखवला आहे, कसा ते आपण पाहुया पुढच्या लेखात !)

गुगल क्रोम ओएस (Chrome OS) - गुगलचे ब्रम्हास्त्र ! गुगल क्रोम ओएस (Chrome OS) - गुगलचे ब्रम्हास्त्र ! Reviewed by Salil Chaudhary on 08:16 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.