चेतन भगतने सिंबॉयसिस कॉलेजमध्ये केलेले भाषण (मराठीत)

आपल्या विशीष्ट शैलीने लिहिणारा आणि तरुणांना भावणारा सध्याचा भारतातील सर्वात तरुण लेखक म्हणजे "चेतन भगत".
सिंबॉयसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या कॉलेजमधील पहील्या दिवशी चेतन भगतने केलेले भाषण खुप प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठीचा चेतनने सांगीतलेला मुलमंत्र केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच उपयुक्त आहे. म्हणुनच खास नेटभेटच्या वाचकांसाठी मी या भाषणाचा मुक्त अनुवाद केला आहे. भाषणाची मुळ इंग्रजी प्रत येथे वाचता येईल.सुप्रभात. या मंचावर बोलावुन आपण मला काही बोलण्याची संधी दीलीत त्याबद्दल धन्यवाद.
हा दिवस तुमचा आहे. तुम्ही, जे काहीतरी बनण्याच्या उद्देशाने आपल्या घरातील आरामाचे जीवन सोडुन आला आहात त्यांचा हा दिवस आहे.


मला खात्री आहे की तुम्ही की खुप उत्साहित आहात. माणसाच्या आयुष्यात काही आनंददायी दिवस असे असतात जे कधीच विसरता येत नाही. कॉलेजमधील पहिला दिवस हा अशाच काही दिवसांपैकी एक. आज पहिल्या दिवशी कॉलेजला येण्यासाठी तयार होत होतात तेव्हा तुमच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल. नविन कॉलेज कसे असेल, येथील प्रोफेसर्स कसे असतील, आपले नविन वर्गमित्र कोण आहेत या सगळ्या विचारांनी तुम्ही उत्कंठीत झाला असाल.
ही उत्कंठा म्हणजेच तुमच्यातील स्पार्क (चमक) आहे, असा स्पार्क ज्याच्यामुळे आज इथे इतके चैतन्यपुर्ण वातावरण आहे. आज मी तुम्हाला हा तुमच्यातील स्पार्क तसाच चमकत ठेवण्याविषयी सांगणार आहे. किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर अगदी नेहमी नाही पण जास्तीत जास्त वेळ आनंदी कसे रहायचे याबद्दल सांगणार आहे.
या आपल्या सर्वांमध्ये असलेल्या स्पार्कची सुरुवात कोठुन होते? मला वाटते आपण सर्वजण जन्मतःच हा स्पार्क आपल्यामध्ये घेउन आलेलो असतो.


माझ्या ३ वर्षांच्या जुळ्या मुलांमध्ये असे लाखो स्पार्क्स मला दीसतात. स्पायडरमॅनचं लहानसं खेळणं पाहुन ते आनंदाने उडया मारतात. वार्‍याची झुळुक अंगावर झेलायला त्यांना मजा वाटते.  झोपताना वडीलांकडुन गोष्ट ऐकण्यासाठी ते आतुर असतात. त्यांचा वाढदिवसाची तयारी कित्येक महीने आधीपासुनच सुरु करतात.
जेव्हा मी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडे पाहतो तेव्हा मला तुमच्यातही हा स्पार्क अजुन शिल्लक राहीला आहे याची जाणीव होते. पण जेव्हा वृद्ध माणसांकडे पाहतो तेव्हा मात्र मला त्यांच्यात स्पार्क दीसत नाही. म्हणजे वयोमानाबरोबर आपल्यातली ही चमक नाहीशी होत जाते. ज्यांनी आपल्या आयुष्यात ही चमक नाहीशी झाली आहे ते थकलेले, हरलेले , जीवनाला कंटाळलेले वाटतात. जब वुई मेट या चित्रपटातील करीना कपुरचा पहिल्या भागातील आणि दुसर्‍या भागातील वागण्यातला फरक आठवा. स्पार्क हरवला तर असे वागणे होउन जाते. तर आपल्यातील ही चमक टीकवायची कशी?

अपल्यातील ही चमक, चैतन्याची तुलना दीव्याबरोबर करा. दीवा सतत तेवत ठेवायचा असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिले म्हणजे वातीला सतत तेल पुरवावे लागते आणि दुसरे म्हणजे वार्‍यापासुन ज्योतीचे संरक्षण करावे लागते. जसं वातीसाठी जे काम तेल करतं तेच काम आपल्यासाठी आपण ठरवीलेली उद्दीष्टे , ध्येये करत असतात. प्रगती करणे, सतत पुढे जात राहणं हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात नैपुण्य मिळवणे, सतत सुधारणा करत राहणे हेच खरे यश आहे. यश मिळवणे म्हणजे अमुक एवढा पगार मिळवणे, एखादी कार किंवा घर असणे हे नव्हे.आपल्यापैकी बहुतांशी लोक मध्यमवर्गीय कुटुंबामधुन आलेले आहेत. आपल्यासाठी घर, गाडी, बंगला या गोष्टी मिळवीणे हीच यशाची व्याख्या असणे सहाजिक आहे आणि तसे ते बरोबर देखिल आहे. जिथे आपल्या दैनंदीन गरजा भागवताना प्रत्येक वेळेला पैशाचा विचार करावा लागतो अशा वातावरणात वाढल्यानंतर आर्थीक सुबत्ता मिळवणे ही खुप मोठी कामगीरी आहे. पण ही एक उपलब्धी असली तरी जीवनाचे अंतीम ध्येय मात्र पैसा कमवणे हे नाही आहे. जर असे असते तर श्री.अंबानी ऑफीसला गेलेच नसते. शाहरुख खानने नवनवे चित्रपट करण्यापेक्षा घरी बसुन आराम करणे पसंत केले असते. स्टीव जॉब्ज ने नविन आय-फोन लाँच करण्यासाठी मेहनत घेतली नसती कारण पिक्सार ही त्याची कंपनी काही बिलीयन डॉलर्सना विकुन त्याने यापुर्वीच बराच पैसा कमावला आहे.

मग तरीसुद्धा या व्यक्ती इतकी मेहनत का करतात. रोज नव्या जोमाने ऑफीसला येण्याची उमेद त्यांच्यामध्ये येथे कोठुन? ते ही मेहनत करतात कारण त्यात त्यांना आनंद मिळतो, स्फुर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आतापर्यंत केलेल्या कामापेक्षा अधिक चांगले काम करण्ञाची त्यांची इच्छाशक्ती त्यांच्याकडुन हे सर्व करुन घेते. आपण जितका अभ्यास जास्त करु तितके चांगले मार्क्स मिळतील. जर इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला मुलाखतीसाठी याचा फायदा होइल. जर प्रॅक्टीस नियमीतपणे केलीत तर तुमचे क्रीकेट सुधारेल. जरी तुम्ही तेंडुलकर बनला नाहीत तरी तुमच्या क्रीकेटचा दर्जा उंचावलेला असेल. पुढची पायरी गाठण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी मेहनत घेणे हे आवश्यक आहे.


निसर्गाने प्रत्येक माणसाला एका वेगळ्या रसायनाने बनवीले आहे. प्रत्येकात काही दोष आणि काही गुण निसर्गानेच दीलेले आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी स्वीकारायला हवी आणि निसर्गाने दीलेल्या देणगीचा सर्वोत्तम वापर केला पाहीजे. तुमच्यासमोर असलेली ध्येये आणि उद्दीष्टे या कामांत तुमची मदत करतील. परंतु मित्रांनो ध्येय फक्त शैक्षणीक किंवा करीअरशी संबंधीत असले पाहीजे असे नव्हे. एक संतुलीत आणि यशस्वी आयुष्य जगता येईल अशी ध्येये ठरवा. मी यशस्वी या शब्दाआधी संतुलीत हा शब्द वापरला हे लक्षात घ्या. संतुलीत म्हणजे चांगले स्वास्थ, नातेसंबंध, कुटुंब आणि मानसीक शांती या सर्वांचा समावेश असलेले जीवन.

ज्या दिवशी प्रमोशन झाले त्याच दिवशी ब्रेक-अप झाला असेल तर त्या प्रमोशनचा काय फायदा. जर पाठ-कंबर दुखीचा त्रास असेल तर गाडी चालवण्याचा आनंद कसा घेता येईल. मनात निरनिराळ्या चिंतांचे तांडव चालु असेल तर कितीही शॉपींग केली तरी ती एंजॉय कशी करता येईल.

"आयुष्य म्हणजे एक कठीण शर्यत आहे. जर  धावला नाहीत तर मागे पडाल" असे तुम्ही बर्‍याच लोकांकडून यापुर्वी ऐकले असेल. पण मला विचाराल तर आयुष्य म्हणजे एक शर्यत जरुर आहे पण धावण्याची नव्हे. आयुष्य म्हणजे आपण लहानपणी बालवाडीत खेळायचो तशी "चमचागोटी"ची चमच्यामध्ये गोटी ठेवुन धावायची शर्यत आहे. जर धावताना चमचामधील गोटी पडली तर पहिला क्रमांक येउनही काय फायदा?

आयुष्य म्हणजे अशीच चमचागोटीची शर्यत आहे जिथे स्वास्थ्य आणि कुटुंब चमचातल्या गोटीप्रमाणे आहेत. जर कुटुंबीयांसोबत सुसंवाद नसेल , मनःशांती नसेल तर ही शर्यत जिंकण्यासाठी केलेला आटापीटा व्यर्थ आहे. आणि इतकी मेहनत करुन ही शर्यत जिंकली तरी युमच्यातला जिवंतपणा, उत्साह टीकवुन ठेवणारा स्पार्क मात्र हळुहळु नष्ट होत जाईल.


आपल्यातला स्पार्क जिवंत ठेवण्यासाठी आणखी एक गोष्ट करा -आयुष्याकडे खुप गंभीरतेने पाहु नका. आम्हाला योगासने शिकवणारे एक गुरुजी आम्हाला शिकवताना खुप हसवत असत. एकदा एका विद्यार्थ्याने त्यांना विचारले की शिकताना इतके हास्यविनोद केल्याने योगासनांच्या शिक्षणावर परीणाम होणार नाही का? यावर गुरुजी उत्तरले , सिरीयस होउ नका, सिन्सीअर व्हा ( don't be serious, be sincere)
त्यानंतर पुढे माझ्या आयुष्यातील प्रत्येक कामात मी गुरुजींचे हे बोल तंतोतंत पाळले. माझे लिखाण असो, नोकरी असो, कुटूंब आणि नातेसंबंध असोत कींवा इतर कोणतीही उद्दीष्टे असोत मी कटाक्षाने हा गुरुमंत्र पाळला.


माझ्या लिखाणाबद्दल मला दररोज हजारो अभिप्राय मिळत असतात. काही स्तुतीपर असतात, काही प्रखर टीका करणारी वक्तव्ये असतात. जर हे सर्व मी खुप गंभीरतेने घेउ लागलो तर मी कधीच लिहु शकणार नाही. मी जगुच शकणार नाही असे म्हंटले तर ती अतीशयोक्ती ठरु नये. म्हणूनच म्हणतो आयुष्यच क्षणभंगुर तात्पुरते आहे तर ते जास्त सिरिअसली घेण्यात काहीच अर्थ नाही. आपण सगळे एका प्री-पेड , लिमिटेड व्हॅलीडीटी असलेल्या सिमकार्ड सारखे आहोत. जर आपण भाग्यवान असलो तर आणखी ५० वर्षे जास्त जगु. ५० वर्षे जास्त म्हणजे फक्त २५०० आठवडे. मग खरंच आपण एवढे बिझी होण्याची आवश्यकता आहे का? काही लेक्चर्स बंक केले, इंटरव्ह्यु मध्ये काही गडबड केली, थोडी मजामस्करी केली, प्रेमात पडलो तर यात काहीच वावगं नाही. आपण माणसं आहोत , प्रोग्राम  केलेल्या मशिन्स नाही आहोत.


मी तुम्हाला तीन गोष्टी सांगीतल्या - संयुक्तीक ध्येये, समतोल आणि आयुष्य फार गंभीरतेने न घेणे. या तीनही गोष्टी जीवनाच्या दीव्यातील वातीसाठी तेलाचे काम करतात. पण या वातीचे चार वेगवेगळ्या वादळांपासुन देखील संरक्षण करावे लागते. अपेक्षाभंग, वैफल्य, असमान वागणुक, आणि वेगळेपणाची भावना.


तुमच्या अथक प्रयत्नाना अपेक्षेप्रमाणे यश आले नाही, जर योजीलेल्या गोष्टींच्या विपरीत घटना घडत राहील्या किंवा सतत अपयशाशी सामना होत राहीला तर निराशा तुम्हाला ग्रासु लागेल. अपयशाशी सामना करणे ही अतीशय कठीण गोष्ट आहे मात्र जे अपयशाला तेवढ्याच ताकदीने सामोरे जातात तेच पुढे खंबीर बनतात. अपयशाचे दु:ख करत बसण्यापेक्षा "यापासुन मी काय शिकलो?" हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे.
बर्‍याचदा असे होइल की तुम्ही अत्यंत दु:खी व्हाल. तुम्हाला सगळं सगळं सोडुन द्यावेसे वाटेल. मला देखील असेच वाटले होते जेव्हा नऊ प्रकाशकांनी माझे पहिले पुस्तक प्रकाशीत करण्यास नकार दीला होता. आय.आय्.टी चे काही विद्यार्थी कमी गुण मिळाले म्हणुन आत्महत्या करतात. किती मुर्खपणाचे आहे हे. मित्रांनो पराभव इतका जिव्हारी लागु शकतो. पण हेच जीवन आहे. जर सर्वच आव्हाने सहजकत्या पेलता आली तर त्याला आव्हान म्हणायचंच कशाला.  लक्षात  ठेवा - जर तुम्ही पराभुत झाला असाल तर याचाच अर्थ तुम्ही आटोकाट प्रयत्न केले आहेत आणि तुमच्या सामर्थ्यानुसार सर्व ते करुन पाहिले आहे. आणि हेच तर आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहे.


पुस्तक लिहुन झाल्यावर मी बॉलीवुड साठी लिखाण करायचे असे ठरवले होते. पुस्तकाला मिळालेल्या यशामुळे मला बॉलीवुडमध्ये सहजगत्या काम मिळाले असे लोकांना वाटले होते. मात्र प्रत्यक्षात माझ्या पहिल्या चित्रपटाला प्रदर्शीत होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी जावा लागला. निराशा आपल्या मनातला उत्साह पार नाहीसा करुन टाकते. सुरुवातीला काम करण्याचा जो जोम असतो त्याची जागा नकारात्मक भावना घेउ लागते आणि हळुहळु आपल्या स्वभावातला कडवटपणा वाढत जातो. या नैराश्याचा सामना कसा कराल?

खरेतर एक चित्रपट बनवायला खुप मोठा कालावधी लागतो, मात्र पाहण्यासाठी फक्त तीन तासच. मुळातच चित्रपटाचा शेवट पाहण्यापेक्षा चित्रपट पाहण्याची एकुण तीन तासांची प्रोसेस प्रेक्षकांना जास्त आनंद देते. मी देखिल याच तत्वाचा उपयोग केला. चित्रापटासाठी उशिर होत होता मात्र मी माझ्या तीसर्‍या पुस्तकाची सुरुवात केली होती. मित्रांना भेटणं, प्रवास, जेवायला बाहेर जाणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी स्वतःला गुंतवुन ठेवलेलं.  लक्षात ठेवा कोणतीच गोष्ट खुप खुप सीरीयसली घ्यायची नसते. जर तुम्ही कधी एखाद्या बाबतीत निराश झालात तर याचा अर्थ तुम्ही खुप सीरीयसली त्याचा विचार करत होतात. 


असमान वागणुक -
असमान वागणुक हाताळणे सगळ्यात कठीण असते परंतु दुर्दैवाने आपल्या देशात असंच चालंतं. बरेच लोक आपल्या मोठ्या लोकांबरोबर असलेल्या ओळखींचा , श्रीमंत वडीलांच्या नावाचा फायदा घेउन, सुंदर चेहर्‍याचा  फायदा घेउन बॉलीवुड मधेच नव्हे तर जवळपास सर्वच ठीकाणी आपले काम साधत असतात. या सगळ्यांना मागे सारुन पुढे जायचं म्हणजे नशीब बलवत्तर असायला हवं. आधीच भारतासारख्या देशात संधी मिळणे कठीण असते. संधी मिळालीच तर नशीबातल्या ग्रहतार्‍यांचा योग जुळुन यावा लागतो. गुणवत्ता आणि मेहनतीचं फळ लवकर मिळतंच असं नाही. त्यासाठी कधीकधी बराच काळ जावा लागतो. मात्र मित्रांनो हे लक्षात असुद्या की काही तुमच्या पेक्षा जास्त भाग्यवान असु शकतात. खरंतर तुम्हाला कॉलेज शिक्षण मिळतंय आणि बर्‍यापैकी इंग्लीश बोलता येतं म्हणजे तुम्ही भारतातल्या काही खुप भाग्यवान मुलांपैकी एक आहात. (बर्‍याच मुलांना तर शाळा  पाहताही येत नाही)    


आपल्याला जे काही मिळालं आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार माना आणि जे आपल्याला मिळालं नाही ते स्वीकारायची हिंमत मिळवा. इतर लेखक कधी कल्पनाही करु शकत नाहीत इतकं प्रेम मला वाचकांकडुन मिळालंय. परंतु मला साहित्य क्षेत्राकडुन फारशी प्रशंसा मिळत नाही. मी ऐश्वर्या राय सारखा दीसत नाही पण मला दोन मुलं आहेत जी माझ्या मते ऐश्वर्या राय पेक्षा खुप सुंदर आहेत. आयुष्यात काही कमी जास्त होत असतं. अशा असमानतेच्या अनुभवांनी खचुन जावु नका.  

सर्वात शेवटी वेगळेपणाची भावना ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यातील स्पार्क मिटवु शकते. जसजसे तुम्ही मोठे होत जाल तुम्हाला जाणवेल की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा इतर मुलांप्रमाणेच तुम्हाला आईसक्रीम आणि सुपरमॅन आवडत असेल. मात्र काही वर्षांनंतर तुम्हाला हे जाणवलं असेल की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमच्या भावना, विचार, आवडीनिवडी इतरांपेक्षा अगदी तुमच्या जवळच्या माणसांपेक्षा वेगळ्या आहेत. यातुनच पुढे इतरांबरोबर मतांतरे होण्यास सुरुवात होते. तुमची ध्येये व उद्दीष्टे इतरांपेक्षा वेगळी असतात. आणि मग या वादात कधीकधी आपली काही ध्येये मागे पडु लागतात. कॉलेजमधील बास्केटबॉल कॅप्टन्स नी त्यांना दुसरे मुल होईपर्यंत बास्केटबॉलला रामराम ठोकलेला असेल. त्यांनी त्यांना आवडणारी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सोडलेली असते. त्यांनी हे त्यांच्या प्रीय कुटुंबीयांसाठीच केलेलं असतं. मात्र हे करताना त्यांनी स्वतःचा स्पार्क मात्र गमावलेला असतो. मित्रांनो कधी चुकुनही अशी तडजोड करु नका. इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करा. 

मित्रांनो, मी तुम्हाला आयुष्यातल्या या चार वादळांबद्दल सांगीतलंय - अपेक्षाभंग, वैफल्य, असमान वागणुक, आणि वेगळेपणाची भावना. ही वादळे टाळता येत नाहीत. दरवर्षी येणार्‍या पावसाप्रमाणेच ही वादळे सतत तुमच्या आयुष्यात येत राहतील. तुम्हाला फक्त तुमच्यातील स्पार्क जपण्यासाठी रेनकोट तयार ठेवावा लागेल.


मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत काळामध्ये स्वागत करतो आहे. जर कोणी मला माझ्या आयुष्यातील काही वर्षे परत देत असेल तर मी नक्कीच माझ्या कॉलेजचे दिवस निवडेन. मला आशा आहे की आणखी १० वर्षांनंतर देखील तुमच्या डोळ्यांत तीच चमक दीसेल जशी आज दीसते अहे. तुमच्यातील स्पार्क फक्त कॉलेज जीवनातच नव्हे तर आयुष्यातील पुढे येणार्‍या २५०० आठवड्यांतही असाच असेल. केवळ तुमच्यातच नव्हे तर भारतवर्षातील प्रत्येकजण आपल्यातील ही चमक जिवंत ठेवेल. आणि मग तुम्ही कधी परदेशात गेलात तर अभिमानाने सांगु शकता, " मी लाखो चमकणार्‍या तार्‍यांच्या देशातुन आलो आहे".
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

चेतन भगतने सिंबॉयसिस कॉलेजमध्ये केलेले भाषण (मराठीत) चेतन भगतने सिंबॉयसिस कॉलेजमध्ये केलेले भाषण (मराठीत) Reviewed by Salil Chaudhary on 08:02 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.