मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - प्रभाकरराव


नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेतील  तृतीय पारितोषिक विजेता लेख


आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. त्यातली कांही प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोचतात, तर कांही फक्त त्यांच्या परिचयातल्या लोकांनाच माहीत असतात. पण अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. आमचे प्रभाकरराव ही अशीच एक व्यक्ती आहे. आमच्या पहिल्या भेटीत शिरस्त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आपण कुठे काम करतो ते सांगितले. पण बोलण्यासारखे इतर असंख्य विषय असल्यामुळे एकमेकांच्या ऑफीसमधे काम, पगार, भत्ते, पदोन्नती वगैरे विषयांबद्दल बोलण्याची आम्हाला कधीच गरज भासली नाही. प्रभाकररावांच्या व्यक्तीमत्वाच्या तानपु-यात अगणित तारा आहेत. त्यातली एकादी तार अचानकच माझ्यातल्या एकाद्या तारेबरोबर जुळायची आणि तिच्या झंकारातून एक प्रकारचा सुसंवाद साधायची असेच नेहमी होत गेले. अत्यंत सुस्पष्ट विचार नेमक्या शब्दात मांडून ते व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली असल्यामुळे बहुतेक संवादातून मलाच लाभ मिळायचा.

 प्रभाकररावांचे कार्यस्थळ त्या काळच्या पुण्याच्या विस्तारापासून दूर आडवाटेला होते, त्यामुळे रोजच्या जाण्यायेण्याच्या दगदगीमुळेच सर्वसामान्य माणूस थकून गेला असता आणि "निवांत फावला वेळ कशाला म्हणतात?" असा प्रश्न त्याने विचारला असता. प्रभाकररावांच्याकडे मात्र चैतन्याचा एक अखंड वाहणारा श्रोत असावा. नोकरी आणि इतर जीवनावश्यक कामांसाठी पुरेसा वेळ आणि श्रम खर्च करून उरलेल्या वेळातला थोडा वेळ ते फक्त स्वतःसाठी बाजूला काढून तो साहित्य, संगीत, कला वगैरेंच्या आविष्कारात घालवत. कथा, कविता, विनोद, लेख, संवाद वगैरे विविध प्रकारचे लेखन ते करायचे. त्या काळी फोटोकॉपीची सोय नव्हती. आपल्या मोत्यासारख्या सुडौल हस्ताक्षरात आपल्या लेखनाच्या अनेक सुवाच्य आणि सुडौल प्रती काढून ते पुण्यातल्या नियतकालिकांकडे नेऊन पोंचवत आणि छापून येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत. प्रभाकररावांचे साहित्य कसल्याही ओळखी पाळखीच्या आधाराशिवाय नियमितपणे प्रकाशित होत होते, ही माझ्या दृष्टीने अद्भुत गोष्ट होती.

 आमच्या शाळेतली चांगले हस्ताक्षर असणारी कांही मुले पुस्तकांतली चित्रे पाहून ती हुबेहूब त्यांच्या वहीत काढायची. पण स्वतंत्र चित्रे काढण्यासाठी प्रतिभेचे लेणे लागते. व्यंगचित्र काढायचे असेल तर विलक्षण निरीक्षण, मार्मिकता, विनोदबुध्दी वगैरे इतर अनेक गुण त्यासोबत लागतात. प्रभाकररावांकडे या सगळ्यांचा संगम असल्यामुळे ते आकर्षक व्यंगचित्रे किंवा हास्यचित्रे काढत आणि ती सुध्दा छापून येत. साहित्य आणि चित्रे यांच्या प्रकाशनाच्या निमित्याने झालेल्या परिचयातून त्यांनी संपादन, प्रकाशन वगैरे बाबी पाहून घेतल्या. इतर साहित्यिकांकडून साहित्य मिळवून आणि त्यात स्वतःची भर घालून एक स्वतंत्र दिवाळी अंक काढला आणि कालांतराने तो बंदही केला. मला अशक्यप्राय वाटणा-या अशा कित्येक गोष्टी ते अगदी सहज हातात घेत, त्या यशस्वीपणे पूर्ण करेपर्यंत त्यासाठी कठोर मेहनत घेत आणि त्यानंतर तितक्याच सहजपणे त्या सोडून देत.

 साहित्याच्या क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा एक नवा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. अनेक नव्या कवींच्या अप्रकाशित काव्यरचना गोळा करून त्यांनी त्या आपल्या सुरेख हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात वेगवेगळ्या ड्रॉइंग पेपरवर लिहून काढल्या, त्यावर समर्पक अशी रेखाचित्रे रेखाटली आणि त्या सर्व कविता मोठमोठ्या आकाराच्या बोर्डांवर चिकटवून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे चक्क प्रदर्शन भरवले. त्याच्या उद्घाटनासाठी मान्यवरांनी हजेरी लावली, स्थानिक वर्तमानपत्रांत त्याचे वृत्तांत छापून आले आणि रसिक पुणेकरांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. त्यात प्रदर्शित केलेल्या काव्यांची एक पुस्तिकासुध्दा ते दरवर्षी काढत. 'काव्यगंध' या नावाचा हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे चालवला. अशा प्रकारची प्रदर्शने नाशिक, नागपूर आदी अन्य शहरात भरवण्याबद्दल विचारणा झाली. परदेशात गेलेल्या मराठी बांधवांनी त्यासंबंधी उत्सुकता दाखवली. विविध प्रकारच्या कवितांचे पोस्टर्स घेऊन आमचे प्रभाकरराव लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसच्या दौ-यावर गेले आहेत असे एक रम्य चित्र मला दिसायला लागले होते. अखेर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 'काव्यतरंग' या नांवाने भारतातच झाले. त्यासाठी परदेशस्थ कवींनी आपल्या रचना ईमेलद्वारे इकडे पाठवणे अधिक सोयिस्कर झाले असावे.

 जितक्या सहजपणे प्रभाकररावांची बोटे कागदावर चालून सुरेख अक्षरे किंवा चित्रे काढतात तितक्याच कौशल्याने ती हार्मोनियमच्या पट्ट्यांवरून फिरून त्यातून सुमधुर अशी नादनिर्मिती करतात. संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण न घेताच एकलव्याप्रमाणे एकाग्रचित्ताने साधना करून त्यांनी आपले वादनकौशल्य कमावले आहे. कुठलीही लकेर ऐकल्यावर ते पहिल्याच प्रयत्नात ती तशीच्या तशी पेटीतून काढतात. ओळखीचे चार संगीतप्रेमी भेटले आणि त्यांची मैफल जमली की कसलेही आढेवेढे न घेता ते पेटीवर बसतात, गाणारा कुठल्या पट्टीत गाणार आहे वगैरे चौकशी न करता त्याची पट्टी अचूक पकडतात आणि कोमल ऋषभ किंवा शुध्द निषाद असली चर्चा न करता त्याच्या गाण्यात आपले रंग भरतात. एकाद्या दर्दी गायकाने काळी चार किंवा पांढरी पांच अशा विशिष्ट पट्टीतले सूर मागितलेच तर त्यातील षड्ज आणि पंचम दाखवून ते त्याचे गाणे सुरू करून देतात आणि त्यालाही उत्तम साथ करतात.

 कांही वर्षांपूर्वी एकदा ते हिमालयातल्या एका दुर्गम अशा जागी गेले असल्याचे ऐकले. त्यांच्या बोलण्यात कधी गिर्यारोहणाचा उल्लेख आला नव्हता. त्यातून ते ऑफीसतर्फे तिकडे गेले असल्याचे समजल्यावर मी अधिकच गोंधळलो. समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या जागी जे अतीशीत आणि विरळ वातावरण असते त्याचा सैनिकांच्या सामुग्रीवर काय परिणाम होतो अशा प्रकारच्या कसल्याशा अभ्यासासाठी गेलेल्या तज्ज्ञांच्या समीतीमध्ये त्यांचा समावेश होता असे नंतर समजले. साहित्य, संगीत, कला वगैरेमध्ये रमणारे हे गृहस्थ उच्च दर्जाचे शास्त्रीय संशोधनाचे कार्य करत होते हे मला माहीतच नव्हते.

प्रभाकरराव सेवानिवृत्त होणार असल्याचे समजल्यावर ते साहित्य आणि संगीताच्या क्षेत्रात कांही भरीव स्वरूपाचे प्रकल्प हातात घेतील असे मला वाटले होते. ते एकादा मोठा ग्रंथ लिहून त्याचे प्रकाशन करतील, संगीत नाटक रंगमंचावर आणतील, कविता, चुटकुले आणि चित्रे यांची प्रदर्शने वेगवेगळ्या शहरात भरवतील, विविधगुणदर्शनाचे कांही अफलातून कार्यक्रम सादर करतील, होतकरू विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा सुरू करतील अशा कांही कल्पना माझ्या मनात आल्या. पण त्यांनी मनात बाळगलेले काम माझ्या कल्पनेच्या अत्यंत स्वैर भरारीच्या पार पलीकडले होते. एका खेड्यात एक जमीनीचा पट्टा घेऊन त्यात स्वतः काबाडकष्ट करून मातीतून मोती पिकवायचे त्यांनी ठरवले. जमीनीची नांगरणी करण्यापासून ते आलेल्या पिकांची कापणी व मळणी आणि झाडांची लागवड करण्यापासून फळांची व भाज्यांची वेचणी इथपर्यंत सारी कामे त्यांनी स्वतःच्या हाताने केली, वेगवेगळ्या प्रकारची बीबियाणे, खते, कीटकनाशके वगैरेंचा उपयोग करून पाहिला आणि या सर्वातून एक वेगळ्याच प्रकारच्या निर्मितीचा आनंद लुटला आणि तितक्याच सहजपणे हा छंदसुध्दा सोडूनही दिला. त्यावर अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितले की शेती करावी किंवा न करावी या दोन्ही बाजूंना पहिल्यापासून परस्परविरोधी अनेक कारणे होतीच. आधी पहिली बाजू जड होती म्हणून मी तसा निर्णय घेतला होता, त्यानंतर तिकडची कारणे हलकी होत गेली आणि दुसरीकडची वजनदार होऊन पारडे उलट बाजूने झुकल्यावर तो बदलला.

 पण त्यानिमित्याने त्यांचे वनस्पतीविश्वाशी जडलेले नाते मात्र तुटले नाही. त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवरच छोटीशी किचन गार्डन तयार केली. दुधाच्या पिशव्यांना बारीक छिद्र पाडून ठिबकसिंचनाचे प्रयोग केले, त्या बागेत लावलेल्या रोपांसाठी सेंद्रिय खत निर्माण करण्याविषयी त्यांचे आगळ्या प्रकारचे संशोधन चालले आहे. मिळेल तो पालापाचोळा गोळा करून ते आपल्या गच्चीवर बसवलेल्या सोलर कुकरमध्ये चांगला शिजवून घेतात आणि त्याचा लगदा थोड्या मातीत मिसळून झाडांच्या मुळापाशी घालतात आणि त्यावर मातीचा थर पसरवतात. त्यामुळे झाडांची जोमाने वाढ होते. किती मातीमागे किती दिवसांनी किती लगदा घालायचा याचे ऑप्टिमायझेशन ते करत आहेत.

 परवा त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच आम्ही टेलिव्हिजनवरील बातम्या पहात होतो. मध्येच "मी एका मिनिटात येतो" असे सांगून प्रभाकरराव उठून आत गेले आणि बाहेर आल्याआल्या त्यांनी सांगितले, "अमक्या अमक्या कंपनीचा भाव साडेअठ्याहत्तर झालेला टीव्हीवर पाहिला म्हणून तिचे शंभर शेअर विकून आलो." मी अचंभ्याने आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, " अहो इथे तर हजारो कंपन्यांचे भाव स्क्रोल होतांना दिसत आहेत, त्यातली नेमकी हीच कंपनी तुम्ही कशी निवडली?" त्यांनी त्यावर सांगितले, "मी याचा सखोल अभ्यास सुरू केला आहे." अनेक कोष्टकांनी भरलेली एक वही दाखवून त्यांनी पुढे बरेच कांही सांगितले, पण ते माझ्या डोक्यावरून चालले होते.

अशा खूप छोट्या छोट्या गंमती माझ्या आठवणीत आहेत. त्या प्रत्येकात आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावरच आली होती. नव्या भेटीत प्रभाकररावांचे कोणते नवे रूप समोर येईल याचा विचारच मी आता करत नाही. त्यामुळे आता आश्चर्य वाटणे जरा कमी झाले आहे. मात्र त्यांची आठवण निघाली की दर वेळी बोरकरांची एक ओळ मला आठवते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती."

आनंद घारे, नवी मुंबई

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - प्रभाकरराव मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - प्रभाकरराव Reviewed by Salil Chaudhary on 07:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.