कोल्हाट्याचं पोर


जिवनात काहीतरी अर्थपुर्ण करण्याची मनिषा बाळगणार्‍यांना सतत आदर्शांचा शोध असतो. वाचनातून व ईतर माध्यमांतून हा आपला शोध सतत चालू असतो. मराठी माणसाला सहजच एका मराठी माणसाची झेप, त्याचं यश प्रेरणादायी ठरतं. खरंच काही काही माणसे जेवढं काही जगतात ते अत्यंत अर्थपूर्ण जगतात, जगावर आपला ठसा उमटवून जातात व अशा माणसांच्या कर्तुत्वावरुन दृष्टीक्षेप टाकताना आपण प्रेरीत होता. अशाच व्यक्तींमधून एक व्यक्तीमत्व मला अक्षरक्षः भारावून टाकतं - ते म्हणजे "कोल्हाट्याचं पोर" या गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे - जे दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत.

तमाशात नाचणार्‍या एका स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या या मूलाने अत्यंत कठीण परिस्थीतीत आपलं आयुष्य काढलं. ज्या समाजात बायका कमावतात व माणसं बसून दारु- मटण खातात, अशा समाजात किशोरच्या आईला अत्यंत नरकासमान जिणे आले. तिला शिक्षीका व्हायचे होते, पण तिच्या वडिलांनी तिचे शिक्षण सोडवून तमाशात घातले. वडिलांचा पत्ता नसलेल्या किशोरने पुढे आपल्या नावासमोर आईचं नाव लावलं व हालाखीच्या परीस्थीतीत आपलं शिक्षण बारावीपर्यंत पुर्ण केलं. त्यासाठी त्याने मजूरी केली, कपडे विकले, उधारी पैसे घेतले, अपमान सहन केले, आईपासून दुरावा सहन केला, लोकांचे नाना बोल सहन केले. त्यांचं आत्मकथन वाचताना डोळ्यात पाणी तराळल्यावाचून राहत नाही.

बारावीत किशोरला उत्तम गुण मिळाले. त्याला मुंबईच्या के.ई.एम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षण घेताना आर्थिक विवंचना सहन केल्या. कित्येक वेळा परीक्षेच्या फी चे पैसे मित्राने भरले. असे अनेक हाल सहन करित त्याने आपले एम्.बी.बी.एस पूर्ण केले. किशोर कोल्हाटी समाजातला पहिला एम्.बी.बी.एस डॉक्टर झाला.

अत्यंत हालाखीत वाढलेल्या किशोरने शिक्षण पुर्ण होताच गरीब गरजूंसाठी फिरते उपचारकेंद्र चालवले. ते स्वतः अ‍ॅलोपॅथी शिकलेले असले तरी त्यांचा आयुर्वेदाकडे जास्त ओढा होता. त्यांनी आदिवासी लोकांमध्ये जाऊन वनौषधीचे ज्ञान घेतले. या ज्ञानाचा त्यांनी अत्यंत माफक दरात गरीबांच्या सेवेसाठी वापर केला. त्यांनी जवळपास दिड ते दोन लाख रुग्णांवर मोफत उपचार केले. चिकुनगुनियासारख्या  आजारावर आयुर्वेदिक उपचार शोधून काढले. संपुर्ण महाराष्ट्रभर संत गाडगेबाबा आयुर्वेदिक उपचार केंद्रांद्वारे रुग्णसेवा केली.

आपल्या अल्पशा जिवनात डॉ. काळेंनी साहित्यसेवाही केली. त्यांचं आत्मचरित्र खुप गाजलं. त्याद्वारे कोल्हाटी समाजाच्या दु:ख वेदना समाजासमोर आल्या. समाज ढवळून निघाला. जगात असही जिणं आहे, हे वाचून लोक विस्मीत झाले. पुढे त्यांच्या आत्मचरित्रावर त्याच नावाचा चित्रपटही आला. त्यांनी 'मी डॉक्टर झालो', 'आहार आणि वनौषधी', 'हिजडा- एक मर्द" अशी पुस्तकेही लिहिली. ते शाळांशाळांतून 'व्यक्तीमत्व विकासा'वर भाषणे देत, एकपात्री आत्मकथन सादर करीत, वनौषधींबद्दल बोलत व उपचार करीत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देत.
त्यांनी समाजाला दाखवून दिलं की  परीस्थीती कितीही बिकट असली तरी त्यातुनही मार्ग काढणारे योद्धे या समाजात आहेत.

आणि........! आपल्या रुग्णवाहिकेद्वारे कुर्डूवाडीकडे येत असताना अचानक टायर फुटून त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि अशा उत्तुंग व्यक्तीमत्वास काळाने आपणांपासून हिरावून घेतले तेही अगदी वयाच्या चौतीसाव्या वर्षी.

अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वाला या लेखाद्वारे माझे अभिवादन !

श्री मधुर नगराळे
चंद्रपूर


सदर लेख नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" या स्पर्धेसाठी श्री. मधुर नगराळे, चंद्रपूर यांनी पाठविला आहे.Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

कोल्हाट्याचं पोर कोल्हाट्याचं पोर Reviewed by Salil Chaudhary on 17:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.