शताब्दी महर्षी 'दादा'

"काही गोष्टी देव आपल्याकडून करून घेत असतो. आपण निमित्त मात्र असतो. माझ्या बाबतीत हे सर्व नियतीने चांगल्याकरिता ठरविले व ते घडवून आणले ही सर्व 'हरीची कृपा' ! त्याकरीता 'परशुराम' नाममात्र ठरले!"
हे शब्द आहेत माझ्या वडिलांचे म्हणजेच प.य.वैद्य खडीवाले यांचे.
नुकताच मा.राष्ट्रपतींच्या हस्ते ती.दादांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल त्यांना शताब्दि महर्षी हा किताब देण्यात आला. सरकार दरबारी त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. परंतु त्यांनी मात्र त्यांचे हे काम कायमच कृष्णार्पण केलेले आहे. कसा झाला हा दादांचा आयुर्वेद प्रवास? थक्क करणारा असाच हा त्यांचा जीवनप्रवास आहे आणि तरुणांना प्रेरणा देणारा सुद्धा !
दादांचा जन्म २४ ऑक्टोबर १९३२ साली पुणे येथे झाला. शालेय शिक्षण रमणबाग प्रशालेत पूर्ण करून त्यांनी कॉमर्स कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली.शाळेपासूनच त्यांच्यावर रा.स्व. संघाचे संस्कार झालेले.त्यामुळेच की काय मोठा मित्रपरिवार, दुसर्‍याच्या मदतीला धावून जाणे, राष्ट्राविषयीचे प्रेम हे गुण त्यांच्या  अंगी लहानपणापासूनच मुरलेले ! सतत कसल्या न कसल्या कामात असणे हा तर त्यांचा स्थायीभाव. कॉलेजशिक्षण चालू असतानाच त्यांच्या मनात काय आले माहित नाही, पण त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी मध्येच शिक्षण सोडून भारतीय विमानदलात नोकरी स्वीकारली. तेव्हा माझ्या आजोबांचा 'हरी परशुराम औषधालय' हा आयुर्वेदाचा घरच्या घरी छोटा व्यवसाय व वैद्यकी सुरू होती. दादा सुट्टीला घरी आले की, आजोबांना औषधे करण्यात मदत करीत. आयुर्वेदातही रस घेत. आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे असे मात्र त्यांना कधी वाटले नव्हते.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यामुळे जेव्हा आजोबा १९६७ साली खूपच आजारी झाले तेव्हा त्यांनी आयुर्वेदाचा व्यवसाय दादांनी सांभाळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि काय आश्चर्य! आपले चांगले स्थिरस्थावर आयुष्य, नोकरी सोडून वडिलांच्या इच्छेखातर दादा पुण्यात आले ते आयुर्वेदाचा वसा घेण्यासाठीच ! आजोबांचे निधन झाले व दादांनी ही आयुर्वेदाची धुरा पुर्णपणे खांद्यावर घेतली. हे काम सोपे नव्हते. एक तर फक्त ग्रंथ वाचून औषधोपचार व औषध निर्मीती पुढे येणार्‍या काळात चालली नसती. बदलत्या काळाची गरज ओळखून दादांनी रीतसर आयुर्वेदाची पदवी घेण्याचे ठरविले व वयाच्या ३६ व्या वर्षी ते तरुणांच्या बरोबरीने अष्टांग आयुर्वेद कॉलेजात दाखल झाले. तेथील सर्व अभ्यासक्रम संस्कृतमध्ये व प्रचंड पाठांतर. पण दादा त्यालाही पुरून उरले.
अभ्यासाबरोबरच संसार चालविण्यासाठी महिना मिळकतही आवश्यकच होती. शिवाय नोकरी सोडताना मिळालेले पेंशनही दादांनी देशार्पण केलेले. त्यामुळे घरचा आयुर्वेदाचा व्यवसायही दादांनी सर्वांगाने वाढवायचे ठरविले. त्यासाठी चित्रशाळा चौकात भाडयाने दुकान घेऊन काष्ठौषधी विक्री केंद्र - हरी परशुराम औषधालय या नावाने सुरु केले. तसेच शनिवार पेठेत जागा घेऊन औषधनिर्मीती कारखाना उभारण्यासाठी बांधकाम सुरु केले. पहाटे उठून अभ्यास, पाठांतर नंतर कॉलेज मग दुकान , दुपारी कारखाना, परत संध्याकाळी दुकान अशी अविश्रांत धावपळ करत दादांनी १९७२ साली वयाच्या चाळीशीत आयुर्वेदाची पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली आणि मग मात्र प्रत्यक्ष धन्वंतरीच जणू त्यांच्या पाठीशी उभा राहिला. दादांनी स्वतःला पूर्णपणे औषध निर्मीती, रुग्णसेवा, व आयुर्वेद प्रसारासाठीचे विविध उपक्रम यात झोकून दिले. पुण्याबरोबरच मुंबई येथेही आठवड्यातील ३ दिवस दादा दवाखाना बघतात. आजतागायत हा त्यांचा नेम चुकलेला नाही. साप्ताहिक सुट्टी ही संकल्पना मुळी त्यांच्या शब्दकोषात नाहीच.
नवीन वास्तु बांधुन झाल्यावर दादांनी १९७१ साली तेथे अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालय चालु केले. तसेच वै. अप्पाशास्त्री साठे वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय स्थापन केले. तसेच औषधनिर्मीतीही मोठ्या प्रमाणावर चालु केली. कारखान्यात दादांनी कामासाठी महिलावर्गालाच संधी दिली. स्त्रीशक्तीची किमया ते ओळखुन आहेत. तसेच अनेक मतीमंद मुलांनाही झेपेल तसे काम देऊन त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. अनेक प्रकारच्या व्यक्तींना  बरोबर घेउन ते आपले  काम पुढे नेतात.
त्यांचे या क्षेत्रातील व्यापक कामांची थोडक्यात नोंद घेतल्यास ती जंत्री याप्रमाणे होईल -
१९७२ पासून सधाशिव पेठेत ज्ञानेश्वर धर्मार्थ औषधालय २० वर्षे चालविले. १९७२ ते १९८२  अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात रसशास्त्र विषयाचे अध्यापन. १९७४ मध्ये वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेची स्थापना, १९७६ आयुर्वेद प्रचारक मासिकाचा शुभारंभ तसेच आयुर्वेदाचे वैद्यक ग्रंथ एकाच छताखाली मिळावेत म्हणून वैद्यक ग्रंथ भांडाराची स्थापना, १९८३ मध्ये रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सहकार्याने जनकल्याण समितीची स्थापना, १९८२ मध्ये नानाजी देशमुख यांचे आवाहनानुसार बीड जिल्ह्यात सर्वांकरीता आरोग्य हा उपक्रम, खेडोपाडी जाऊन दर आठवड्याला मोफत चिकीत्सा व रुग्णोपचार शिबिरे, १९८४- सर्वांसाठी नि:शुल्क आयुर्वेद परीचय वर्गाची सुरुवात तोच पुढे गुरुकुल पुणे नावाने सुपरीचीत, १९८५ - सोळा डॉक्टरांच्या सहकार्याने नेत्रसेवा केंद्र चालू, विविध ठीकाणी नेत्रचिकित्सा शिबिरे, मोफत नेत्र तपासणी. नेत्रदानाच्या प्रचारासाठी शहरभर पदयात्रा, जनकल्याण नेत्रपेढीची स्थापना, १९८६ पासून वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार देण्यास सुरुवात, त्यात इतरही अन्य पुरस्कारांची वेळोवेळी भर पडत गेली आहे.१९९२ ते १९९९ या कालावधीत तीन विश्व वैद्य संमेलनाचे यशस्वी आयोजन, तळेगावला महिला विकासासाठी वं. ताई आपटे प्रतीष्ठान तसेच आकुर्डी निराधार महिला व अनाथ बालकांसाठी आधार केंद्राची स्थापना, ठाणे जिल्ह्यात देवबांध येथे डोंगरात औषधी वनस्पती लागवड व राम मंदिर स्थापना, २००० मध्ये औषधी वनस्पतींच्या प्रमाणीकरणासाठी वं. ताई आपटे प्रयोगशाळा सुरु, २००१ - महाराष्ट्र आयुर्वेद औषधी उत्पादक संघाची स्थापना , २००३ ते २००५ मध्ये तीन वेळा अन्नकोट प्रदर्शन, "नैवेद्यम" या पुस्तकाचे प्रकाशन, २००६- अ.भा. विज्ञान परीषद व पुणे विद्यापीठ आयुर्वेद विभागातर्फे भरविलेल्या प्रदर्शनात सहभाग, पुणे महापालिकेच्या गाडीखाना रुग्णालयात अनेक वर्षे - विशेषकरुन एड्स ग्रस्तांसाठी - मोफत आयुर्वेदोपचार, याशिवाय वरचेवर व्याख्यानसत्रे मोफत औषधीकरण प्रशिक्षण शिबिरे, मोफत पंचकर्म शिबिरे, प्रदर्शने, आयुर्वेदाबाबत जनजागृती, विविधांगी आयुर्वेदीय ग्रंथ संपदा, हिंदू तन मन साप्ताहिक, औषधी वनस्पती लागवड प्रसार, अनेक प्रकारचे मेळावे अन महामेळावे असे व्यापक कार्य आज ७८ व्या वर्षीही अथकपणे व सातत्याने चालू आहे. तेही हसतमुखाने व सर्वांना बरोबर घेऊन. यालाच कोणीही एक व्रती जीवन म्हणून संबोधेल.
असा त्याग, अविश्रांत मेहनत, जिद्द, चिकाटी, श्रद्धा, सर्वसमावेशकता, मानवता ही भविष्यात अनेकांची प्रेरणा होऊ शकते. म्हणूनच म्हणावेसे वाटते,

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती"

- सौ. यशगौरी अनंत गोखले, पुणे


सदर लेख नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" या स्पर्धेसाठी सौ. यशगौरी अनंत गोखले, पुणे यांनी पाठविला आहे.


   
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

शताब्दी महर्षी 'दादा' शताब्दी महर्षी 'दादा' Reviewed by Salil Chaudhary on 18:47 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.