"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग तिसरा.)



मित्रहो, आज आपण गुगल अ‍ॅडसेन्स खाते उघडण्यासाठी आणि मंजुर होण्यासाठी आवश्यक असणारी पुर्वतयारी करणार आहोत.
गुगल अ‍ॅडसेन्स खाते उघडण्यासाठी सर्वात  आधी तुमच्याकडे एक वेबसाईट किंवा ब्लॉग असणे आवश्यक आहे.


जर तुम्हाला प्रोग्रामिंगचे ज्ञान नसेल तर वेबसाईट बनविणे अतिशय किचकट काम आहे. वर्डप्रेस.कॉम मधील ब्लॉग्जमध्ये जाहिराती दाखविण्यास मनाई आहे. (मात्र वर्डप्रेस ब्लॉग जर तुम्ही स्वतः होस्ट (Self Hosted) केलेला असेल तर त्यावर जाहिराती दाखविता येतात.) त्यामुळे अ‍ॅडसेन्स अकाउंट मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्लॉगर्.कॉम वरील ब्लॉग. माझा असा अनुभव आहे की ब्लॉगर्.कॉम वरील ब्लॉग्जना अ‍ॅडसेन्सची मंजुरी (Adsense Approval) लवकर मिळते.



मराठी ब्लॉगर्ससाठी टीप - जर तुम्ही यापुर्वीच गुगल अ‍ॅडसेन्स खाते उघडले असेल आणि ते मंजुर झाले असेल तर ठीक आहे. मात्र अद्याप तुमचे अ‍ॅडसेन्स खाते बनले नसेल किंवा मंजुर झाले नसेल तर एक नविन ब्लॉग बनवा. या नविन ब्लॉगचा वापर आपण अ‍ॅडसेन्स खात्याची मंजुरी मिळविण्यासाठी करणार आहोत.
शिवाजी महाराजांनी शिकविलेल्या गनिमी काव्याचा वापर आपण येथे करणार आहोत :-). थोडक्यात, या नविन ब्लॉगचा वापर आपण गुगलला फसविण्यासाठी करणार आहोत.
गुगल अ‍ॅडसेन्स अकाउंट साठी नोंदणी करण्यापुर्वी आपण बनविलेला नविन ब्लॉग अ‍ॅडसेन्ससाठी तयार करुयात. पहिल्यांदा या ब्लॉगच्या सेटींग्ज मध्ये जाऊन ब्लॉगची भाषा English आहे याची खात्री करुन घ्या. आता या ब्लॉगवर रोज एक याप्रमाणे लेख प्रकाशित करायचे आहेत. मात्र हे लेख इंग्रजी भाषेमध्ये असले पाहिजेत.
जर तुम्हाला इंग्रजी मध्ये लेख लिहिता येत असतील तर ठीकच आहे. जर येत नसेल (माझ्यासारखं) तर एक युक्ती सांगतो. एखादा जुना इंग्रजी पेपर किंवा जुने इंग्रजी मासिक घ्या (फारसे प्रसिद्ध नसलेले), किंवा शाळेमध्ये मुलांना इंग्रजी निबंधांची पुस्तके असतात तशी पुस्तके, किंवा इतर कोणतेही २-३ पानांच्या छोट्या छोट्या गोष्टी असलेले पुस्तक घ्या (फारसे प्रसिद्ध नसलेले). आता तुम्हाला ब्लॉग पोस्टसाठी मजकुर मिळालेला आहे. गरज आहे ते फक्त टाईप करण्याची. रोज एक लेख/ गोष्ट/ निबंध आता पोस्टच्या स्वरुपात तुम्हाला ब्लॉगवर लिहायची आहे. (तुम्ही ब्लॉगसाठी जो इंग्रजी मजकुर वापरणार आहात तो यापुर्वीच इंटरनेटवर उपलब्ध नसल्याची खात्री करून घ्या.) असे साधारण ३०-४० लेख ब्लॉगवर लिहा (दररोज एक !).

आता गुगल अ‍ॅडसेन्सची मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक असणार्‍या "इंग्रजी भाषा" या एका गोष्टीची पुर्तता आपण केलेली आहे.
गुगलची दुसरी आणि महत्त्वाची अट आहे ती म्हणजे Trafic. तुमच्या ब्लॉगला भेट देणारे नियमीत वाचक असले पाहिजेत. कारण वाचक नसतील तर गुगलच्या जाहिराती पाहणार कोण? आपण या नविन ब्लॉगची ट्रॅफिक वाढविण्याचे उपाय पाहुया.

तुम्ही लिहिलेले इंग्रजी लेख वाचनीय असतील तर थोडीबहुत ट्रॅफिक मिळेलच. परंतु लाखो इंग्रजी ब्लॉग्जवर दररोज चांगले लेख लिहिले जात असताना आपले कॉपी केलेले लेख वाचणार कोण? मित्रहो, इथे आपल्या मदतीला धावणार आहे मायमराठी.
ट्रॅफिकसाठीचा गनिमी कावा नंबर २ :-)

वर दिल्याप्रमाणे दररोज एक इंग्रजी लेख तुम्ही लिहिणार आहातच. मात्र त्याबरोबर दर २-३ दिवसांतुन एक लेख मराठी भाषेत देखिल लिहा. आणि मराठीतील लेख तरी किमान कॉपी न करता स्वतः चांगले लेखन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले मराठी लेख वाचनीय असणे महत्त्वाचे असते. कारण ट्रॅफीक याच लेखांना मिळणार आहे मात्र गुगलला वाटेल की ट्रॅफिक तुमच्या संपुर्ण ब्लॉगला मिळत आहे. तसेच काही इंग्रजी लेखांचे मराठीत भाषांतर करुन इंग्रजी व मराठी मिश्रीत पोस्ट तयार करा.


असे केल्यावर तुमच्या ब्लॉगवर तीन प्रकारचे लेख दिसतील.
१. पुर्ण इंग्रजी पोस्ट्स -  उदाहरण पहा - दररोज १ लेख ( तुमच्या ब्लॉगवरील ७०% पाने इंग्रजीतील असली पाहिजेत.)

२. पुर्ण मराठी पोस्ट्स -  दर २-३ दिवसांनी एक लेख
३. मराठी इंग्रजी मिश्रीत पोस्ट्स - उदाहरण पहा  -  दर ५-६ दिवसांनी एक लेख


(मी डॉक्टरने औषधांची मात्रा सांगितल्याचा आव आणतोय. १-२ दिवस मागेपुढे झाले तरी चालेल बरं का !!)
नविन ब्लॉग चालु करुन साधारण एका महिन्यानंतर सर्व ब्लॉग डीरेक्टरीज (Blog Directories) मध्ये ब्लॉग नोंदणी करा. त्याचसोबत आपल्या मराठमोळ्या साईट्सवर म्हणजे ब्लॉगकट्टा, मराठी ब्लॉगविश्व, ब्लॉगवाणी, मराठीकट्टा, मराठीसुची या सर्व साईट्सवर नोंदणी करा. कारण तुम्हाला हवी असलेली ट्रॅफिक ही याच साईट्सवरुन येणार आहे.
त्याचप्रमाणे तुमच्या ईतर ब्लॉगर मित्रांना त्यांच्या ब्लॉगरोल मध्ये या नविन ब्लॉगचे नाव टाकण्याची विनंती करा. व तुम्ही स्वतःदेखिल त्यांच्या ब्लॉगचे नाव ब्लॉगलिंक्स मध्ये अपडेट करा. (एकमेका सहाय्य करु , अवघे धरु Adsense पंथ)
किमान दोन महिने ही प्रक्रीया करत रहा. दररोज नविन व सकस लेखन , भरपुर लिंकींग आणि ट्रॅफिक वाढविण्यासाठी अथक प्रयत्न करत रहा. ही दोन महिन्याची तयारी पुढे खुप महत्त्वाची ठरणार आहे.

गुगल अ‍ॅडसेन्सची तिसरी अट म्हणजे तुमची साईट पुर्ण असली पाहिजे.
यासाठी ब्लॉगवरील Pages चा पर्याय वापरावा लागेल. ब्लॉगर मधील Pages या सुविधेबद्द्ल मी यापुर्वी एका लेखात माहिती दिली होती. याच सुविधेचा वापर करुन ब्लॉगबद्दल माहिती देणारी मुख्य पाने जोडा. यामध्ये प्रामुख्याने "आमच्याबद्दल" (About Us), "संपर्क" (Contact Us),Subscribe आणि Privacy policy अशी मुख्य पाने येणे आवश्यक आहे. गुगलच्या लेखी Privacy policy अत्यंत महत्त्वाची आहे. Privacy policy sample असे गुगल सर्च केल्यावर तुम्हाला Privacy policy चे अनेक नमुने मिळतील. त्यापैकी एक आपल्या ब्लॉगवरील privacy policy या पानावर चिकटवा.


सर्व पाने ब्लॉगवर आल्यानंतर आणि सुमारे ५० ते ७० लेख झाल्यानंतर तुमचा ब्लॉग अ‍ॅडसेन्स साठी तयार झालेला असेल.
अ‍ॅडसेन्स साठी नोंदणी करण्याआधी आणखी काही गोष्टी करता येतील.
१. Feedburner मध्ये ब्लॉगची फीड सर्वीस चालु करुन घ्यावी आणि सर्व मित्रमंडळींना, ब्लॉगरमित्रांना आणि वाचकांना subscribe करण्यास सांगावे.
२. गुगल, बिंग, याहु, AOl आणि इतर सर्व सर्च इंजिन्समध्ये आपला ब्लॉग समाविष्ट करुन घ्यावा. (Blog listing)
३. विविध ब्लॉग्ज आणि संकेतस्थळावर कमेंट्स लिहाव्यात (इथे लिहिल्यात तर आनंदच आहे !) आणि सोबत आपल्या ब्लॉगची लिंक द्यावी.
४. गुगल अ‍ॅनॅलिटीक्सचा कोड ब्लॉग टेम्प्लेटमध्ये चिकटवून आपल्या ब्लॉगच्या वाचकांची पुरेपुर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा.
५. ब्लॉग पोस्ट्स मध्ये Slideshare.com आणि youtube.com वरील प्रेझेंटेशन्स आणि व्हीडीओज दाखवा. यामुळे ब्लॉगला अतीरीक्त लिंक्स मिळतात आणि जाहिरातींसाठी चांगले असे कंटेंट आपोआप ब्लॉग्जवर येते.
६. ब्लॉग पोस्ट मध्ये चित्रांचा वापर करणे केव्हाही चांगले. मात्र वापरलेली चित्रे कॉपीराईट कायद्याचा भंग करणारी नसावीत. चित्रांना Alt tag असणे अतिशय महत्त्वाचे आहे. Alt tag वापरण्याबद्दल माहिती मी नंतर देईनच मात्र तुम्ही स्वतः गुगल वर शोधुनही ती माहिती मिळवु शकता.
 मित्रहो, आता तुमचा ब्लॉग (आणि तुम्ही !) अ‍ॅडसेन्स साठी नोंदणी करण्यास तयार आहे. अ‍ॅडसेन्स मध्ये नाव नोंदणी करताना पुर्ण नाव, पुर्ण पत्ता, आणि बँक अकाउंटची माहिती नीट द्या.

मी एक वर्षापुर्वी अ‍ॅडसेन्स अकाउंट उघडले होते तेव्हा त्यास लगेच मंजुरी मिळाल्याचे मला आठवत आहे. मात्र आता गुगलने अ‍ॅडसेन्स अकाउंट सहजासहजी देणे बंद केले आहे (कारण मंदीच्या लाटेमुळे एक उत्पन्नाचा पर्याय म्हणून बरेचजण ब्लॉगींगकडे वळले). आपल्या तयारीनुसार एका महिन्यात मंजुरी मिळणे अपेक्षीत आहे मात्र काही ठीकाणी हा कालावधी ६ महिन्यांपर्यंतचा असू शकतो. मात्र निराश न होता अ‍ॅडसेन्सची मंजुरी मिळेपर्यंत ब्लॉग वर दिलेल्या पद्धतीनुसार अपडेट करत रहा.

आपल्या या कामात कमालीचा संयम हवा आहे हे मी आधीच सांगीतले आहे. लक्षात ठेवा Patience pays ! Always !




Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग तिसरा.) "गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग तिसरा.) Reviewed by Salil Chaudhary on 07:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.