"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग दुसरा.)
अ‍ॅडसेन्स म्हणजे नक्की काय ?

अ‍ॅडसेन्स हा गुगल काकांनी सुरु केलेला प्रकल्प आहे. Google Adsense या प्रोग्राममध्ये विविध वेबसाईट्सवर आणि ब्लॉग्जवर गुगलतर्फे जाहिराती दाखविल्या जातात. या जाहिराती आपल्या संकेतस्थळावर किंवा ब्लॉगवर दाखविण्यासाठी प्रकाशकाला (Publisher) गुगलतर्फे पैसे मिळतात. थोडक्यात जाहिरातदार आणि प्रकाशक यांच्यामधील दुव्याचे काम गुगल अ‍ॅडसेन्स मार्फत केले जाते. संकेतस्थळ चालवणार्‍यांना आपल्या साईटवरील जागेवर जाहिराती विकून पैसे कमवायचे असतात तर जाहिरातदारांना विविध विषयांवरील संकेतस्थळावर येणार्‍या लाखो वाचकांपर्यंत आपल्या उत्पादनाची जाहिरात पोहोचवायची असते. या दोनही दुव्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम गुगल अ‍ॅडसेन्स करते.


आपण सर्वच गुगल सर्च वापरतो मात्र आपणापैकी बर्‍याच जणांना गुगल सर्च इंजिन पैसे कसे कमावते ते ठाऊक नसते. गुगल.कॉमचा मुख्य व्यवसाय आहे Advertising म्हणजेच जाहिरातींचा. गुगल सर्च केल्यानंतर आलेल्या परीणामांमध्ये (Search results) वर आणि उजव्याबाजुला ज्या Sponsored links येतात त्या म्हणजे गुगलने दाखविलेल्या जाहिराती असतात. तसेच बहुतांशी वेबसाईट्सवर Ads by Google या नावाने ज्या जाहिराती दिसतात त्या जाहिराती गुगलने दाखविलेल्या असतात.

ईंटरनेटचे साम्राज्य  पसरण्याआधी आपण माहिती शोधायसाठी यलो पेजेस (Yellow pages) वापरायचो (आठवतं का?). यलो पेजेस मोफत वाटण्यात येत असे मात्र त्यामध्ये प्रकाशित केलेली माहिती ज्या व्यवसायांची असे त्यांच्याकडून यलो पेजेसचे प्रकाशक पैसे घेत असत.
उदाहरणार्थ - जर "संगणक जोडणी" हा विषय यलो पेजेस मध्ये शोधला तर संगणक जोडणी करणार्‍या २०-३० उद्योगांची यादी दिसते. या यादीमध्ये सर्वात प्रथम नाव येण्यासाठी व्यावसायिकाला इतरांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत. या यादीमध्ये पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या,चौथ्या ई. क्रमांकावर नाव येण्यासाठी लिलाव (Bidding) पद्धतीने जागा विकल्या जात असत.

गुगलचा व्यवसाय देखिल याच तत्त्वावर आधारीत आहे. वरील उदाहरणाच्या अनुशंगाने पहायचे तर "संगणक जोडणी" हा Keyword आहे. या Keyword शी संबंधीत उद्योग गुगलवर जाहिराती देताना (गुगलवर जाहिराती देण्यासाठी असलेल्या प्रोग्रामचे नाव Adwords असे आहे) "संगणक जोडणी" या Keyword साठी बोली लावतात. त्यानंतर कोणी "संगणक जोडणी" असा सर्च गुगलवर केल्यानंतर सर्च रीझल्ट्सच्या बाजुला जाहिरातदारांच्या जाहिराती (Sponsored links) दिसतात.

मात्र फक्त एवढ्यावर न थांबता गुगल आणखी एक पाउल पुढे गेले आहे. सर्च रीझल्ट्समध्ये आलेल्या लिंक्सपैकी एका लिंकवर क्लिक करुन वाचक त्या विषयाशी निगडीत वेबसाईटवर वळवले जातात. गुगलने या वेबसाईट्सवर देखिल (यालाच Content pages असे म्हणतात) जाहिराती दाखविण्याची हुशारी दाखविली. Ads by Google या नावाखाली बहुतांशी संकेतस्थळांवर जाहिराती दाखविण्यास गुगलने सुरुवात केली. अशा तर्‍हेने ऑनलाईन जाहिरातींच्या जगतात गुगलचे  साम्राज्य पसरविणारा Adsense हा प्रोग्राम अस्तीत्वात आला.


अ‍ॅडसेन्स कसे काम करते?

गुगल अ‍ॅडसेन्स कसे काम करते हे पाहणे अतिशय रंजक आहे. गुगलच्या या जाहिरातींच्या व्यवसायात प्रामुख्याने तीन व्यक्तींचा (किंवा व्यक्तीसमुहाचा) समावेश असतो.


१. जाहिरातदार (Advertiser) - गुगल अ‍ॅडवर्डस प्रोग्राम वापरुन जाहिरातदार गुगलच्या सर्च पानांवर आणि अ‍ॅडसेन्समध्ये सहभागी असणार्‍या वेबसाईट्सवर (Content pages) जाहिराती दाखवितात. जाहिरातदार प्रकाशकांना PPC (Pay per Click) व CPM (Pay per thousand impressions) यापैकी एका प्रकाराने पैसे देतात. (या दोन प्रकारांबाबत अधिक माहिती पुढील लेखात येणार आहे.) जाहिरातदारांना कोणत्या वेबसाईट्स वर जाहिराती दाखवायच्या हे निवडण्याची मुभा असते.


२. वेब प्रकाशक (web Publishers) - वेब साईट चालविणार्‍या व्यक्ती आणि ब्लॉगर्स म्हणजे वेब प्रकाशक. वेब प्रकाशक गुगलच्या अ‍ॅडसेन्स सेवेमध्ये आपल्या ब्लॉगची किंवा संकेतस्थळाची नोंदणी करतात. एकदा अ‍ॅडसेन्स जाहिराती दाखविण्याची मंजुरी मिळाल्यानंतर वेब प्रकाशक आपल्या साईटवर जेथे जाहिराती दाखवायच्या आहेत तेथे Google adsense चा javascript code चिकटवतात. जाहिरातींचा आकार, रंग, स्वरुप इत्यादी गोष्टी प्रकाशकांना ठरवता येतात.


३. वेब वाचक - वेब वाचक म्हणजे ब्लॉग आणि संकेतस्थळे वाचणार्‍या व्यक्ती. (म्हणजे इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण !). वाचक गुगलवर एखादा Keyword सर्च करतात आणि आलेल्या शोध परीणामांपैकी कोणत्याही एका साईटवर जातात. वाचकांनी या पानांवर दिसणार्‍या जाहिरातींवर क्लिक केल्यावर (PPC) किंवा फक्त जाहिरात वाचल्यावर (CPM) वेब प्रकाशकाला जाहिरातदारांकडून पैसे मिळतात. या रकमेपैकी काही भाग गुगल आपल्याकडे ठेवते आणि उर्वरीत भाग प्रकाशकांना मिळतो. मात्र जाहिरातदाराला मिळणारी रक्कम ठरविण्याचा फॉर्म्युला गुगलतर्फे गुप्त ठेवण्यात आलेला आहे.


अ‍ॅडसेन्स सर्वात यशस्वी का आहे?

गुगल अ‍ॅडसेन्स आजपर्यंतेची सर्वाधिक यशस्वी जाहिरात सर्वीस आहे. अ‍ॅडसेन्सच्या यशामागील सर्वात महत्वाचे कारण आहे Contextual Ads व Targeted Ads.
थोडं सोप्या भाषेत सांगतो.

वाचक गुगलवर एखादा Keyword सर्च करतात आणि आलेल्या शोध परीणामांपैकी कोणत्याही एका साईटवर जातात. यादरम्यान गुगलने वाचकाबद्दल काही गोष्टी जाणलेल्या असतात. वाचकाने जो Keyword शोधला त्यावरुन सध्या वाचक कोणत्या माहितीच्या अथवा उत्पादनाच्या शोधात आहे, जगामध्ये कुठुन वाचक सर्च करत आहे ती जागा (Geographical location) , वाचकाच्या वेब हिस्ट्री वरुन त्याने यापुर्वी ज्या प्रकारची वेबपाने पाहिली आहेत त्याम्च्याबद्दलची माहिती, ज्या वेबपानावर वाचक आलेला आहे त्या वेबपानावर असलेला मजकुर या गोष्टींचा अ‍ॅनॅलिसिस गुगलकडे तयार होतो. आणि या माहितीच्या अनुशंगाने वाचक सध्या वाचत असलेल्या पानावर संबंधीत जाहिराती दाखविल्या जातात.


उदाहरणार्थ - How to calculate EMI in excel? असा गुगल सर्च केल्यानंतर पहिला रीझल्ट नेटभेटचा येतो.


या वर क्लिक करुन नेटभेटवर संबंधीत लेखावर वाचक गेल्यानंतर त्याला ज्या जाहिराती दिसतात त्या EMI, HOME LOAN , EXCEL, Property dealers, builders, property websites अशा विषयांवरच्या जाहिराती दिसतात. जर वाचक भारतातील असेल तर त्यास भारतीय कंपन्यांच्या जाहिराती दिसतील आणि वाचक USA मधुन असेल तर त्यास तेथील संबंधीत कंपन्यांच्या जाहिराती दिसतील (Targeted Ads).यालाच Contextual ads असे म्हणतात. Contextual ads मुळे जाहिरातदारांना खुप फायदा होतो. कारण जेव्हा वाचक एखाद्या उत्पादनाबद्दल सर्च करतो तेव्हा तो वाचक ते उत्पादन घेण्याच्या विचारामध्ये असतो म्हणजेच तो एक तयार ग्राहक असतो. अशा ग्राहकाला त्याचवेळेस आपल्या उत्पादनाची जाहिरात दाखविल्यामुळे तो लगेचच खरेदी करण्याची शक्यता अधिक असते.

हे झाले जाहिरातदारांबद्दल.


वेब प्रकाशकांना अ‍ॅडसेन्स आवडते कारण जाहिरातींसाठी त्यांना कोठेही जावे लागत नाही. नविन जाहिराती शोधणे, बनविणे, ब्लॉगवर चिकटविणे या गोष्टींपासून वेब प्रकाशक मोकळा होतो. एकदा जाव्हास्क्रीप्ट कोड चिकटवला की काम सुरु.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे Contextual Ads मुळे ब्लॉगच्या वाचकांना मदतच होते. उगाच कोणत्यातरी अनावश्यक उत्पादनाची जाहिरात करण्यापेक्षा वाचकांना काही उपयुक्त व संबंधीत माहिती मिळते.

म्हणूनच अ‍ॅडसेन्स सर्वात यशस्वी जाहिरात प्रोग्राम आहे.


हा लेख खुपच लांबला त्याबद्द्ल क्षमस्व. (मला अजुनही याबद्दल बरेच काही लिहावसं वाटतंय !) अ‍ॅडसेन्सच्या कामाची पद्धत नीट समजावुन घेतल्यामुळे पुढे आपली साईट/ ब्लॉग SEO साठी तयार करण्यात भरपूर मदत होणार आहे.

(या पुढील लेखामध्ये आपण अ‍ॅडसेन्स खाते चालू करण्यासंबंधी माहिती व नियम पाहणार आहोत. तेव्हा नेटभेटला भेट देत रहा :-) )

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग दुसरा.) "गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग दुसरा.) Reviewed by Salil Chaudhary on 10:21 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.