अरविंद आय केअर - एक असामान्य संस्था !

जगातील सर्वात मोठे डोळ्यांचे हॉस्पीटल कोठे आहे? मला खात्री आहे की माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी बर्‍याच जणांना वाटत असेल की जगातील सर्वात मोठे डोळ्यांचे हॉस्पीटल अमेरीका, इंग्लंड किंवा तत्सम प्रगत देशामध्ये असेल. पण मित्रांनो, हे हॉस्पीटल आपल्या भारत देशामध्येच आहे. तामिळनाडू मधील "मदुराई" या शहरात असलेल्या या हॉस्पीटलचे नाव आहे - "अरविंद आय केअर सीस्टम (Arvind eye care system)".

अरविंद आय केअर हॉस्पीटल हे सरकारी हॉस्पीटल नाही किंवा कोणत्याही मोठ्या संस्थेने चालवलेले हॉस्पीटल नाही. डॉ. गोविंदप्पा वेंकटस्वामी यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या खर्चाने चालु केलेले हे हॉस्पीटल आहे. डॉ. वेंकटस्वामी यांना अरविंद हॉस्पीटल मध्ये डॉ. व्ही (Dr. V) असे संबोधले जाते. डॉ. वेंकटस्वामी यांनी १९७६ अरविंद आय केअरची स्थापना केली त्यावेळी त्यांचे वय होते ५८ वर्षे. या वयात  जेव्हा लोकांना निवृत्तीचे वेध लागतात तेव्हा डॉ. वेंकटस्वामींनी ११ खाटांचे हे हॉस्पीटल चालू केले. एव्हढेच नव्हे तर तेव्हा त्यांना स्वतःला rheumatoid arthritis नावाचा आजार झाला होता आणि त्यामुळे त्यांचा एक हात लुळा झाला होता. मात्र असे असतानाही दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या बळावर डॉ. वेंकटस्वामी यांनी या हॉस्पीटलची स्थापना केली. हेतू केवळ एकच, जास्तीत जास्त अंध लोकांपर्यंत पोहोचून त्यांना नविन दृष्टी द्यायची.


संपुर्ण जगात सुमारे ४५ दशलक्ष लोकांना अंधत्व आलेले आहे. त्यापैकी १२ दशलक्ष लोक भारतात आहेत. आणि मुख्य म्हणजे भारतातील १२ दशलक्ष लोकांपैकी ८०%  लोकांचे डोळे उपचाराने बरे करता येतील. म्हणजेच या ८०% लोकांचे अंधत्व दूर करता येईल. अत्यंत गरीब , अशिक्षीत लोकांना डोळ्यांसाठी साधा चष्मा घेणेदेखिल शक्य नसते. आपल्यापैकी शहरात राहणार्‍या कित्येकांना चष्मा वापरावा लागतो, बर्‍याच वेळा चष्मा आपल्या फॅशनचा एक भाग बनतो. पण समाजात काही लोक असे आहेत की ज्यांना चष्मा विकत घेणे परवडत नाही आणि त्यामुळे त्यांना अंधत्व पत्करावे लागते. असाच काहीसा प्रकार मोतीबिंदू बाबतही आहे.  केवळ गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करता न आल्याने अनेक जण  अंधत्व पत्करतात. एका डोळ्याला मोतीबिंदू झाल्यावर दुसरा डोळा शाबूत आहे तोपर्यंत कसेबसे काम निभावून नेतात. मात्र दृष्टीहीन झाल्यावर हातावर पोट असलेल्या या लोकांचे अतीशय हाल होतात. या दुष्टचक्रातून त्यांची सुटका करण्याच्या हेतूने डॉ. वेंकटस्वामी यांनी अरविंद आय केअरची सुरुवात केली आणि आज हे हॉस्पीटल जगातील सर्वात मोठे डोळ्यावरील उपचार करणारे हॉस्पीटल झाले आहे.

डॉ. वेकंटस्वामी यांनी या प्रकल्पाची मांडणी करताना मॅकडॉनल्ड्स या सुप्रसिद्ध फास्टफुड कंपनीच्या कार्यप्रणालीचा आधार घेतला होता.  वाचून हसु येईल कदाचित पण हे खरे आहे. जगातील विविध भागांतील लोकांना एकाच प्रकारे प्रशिक्षण देऊन,  सर्वत्र एकसमान पद्धती आणि प्रणाली वापरून मॅ़कडोनल्ड्सच्या कोणत्याही हॉटेल मध्ये एकसमान उत्पादन देण्याच्या क्षमतेची डॉ. वेंकटस्वामी यांनी डोळ्यांच्या उपचारांशी गाठ घातली. अरविंद आय केअर मधील ऑपरेशन्स हे याच प्रणालीवर आधारीत असतात. यामध्ये डॉक्टर्स एका जागी उभे असतात आणि कारखान्यातील उत्पादनांप्रमाणे रुग्ण एका मागोमाग एक येत असतात. सर्व वेळखाउ आणि सोप्या गोष्टी डॉक्टरांच्या मदतीला असलेल्या नर्स आणि तंत्रज्ञांनी केल्यामुळे डॉक्टरांवर अतीरीक्त भार पडत नाही आणि त्यामुळे डॉक्टरांची उत्पादकता वाढते.  भारतातील इतर डॉक्टर्स वर्षाला २२० डोळ्यांची ऑपरेशन्स करतात मात्र अरविंद आयकेअर मधील डॉक्टर्स वर्षाला २००० ऑपरेशन्स करतात. येथे डॉक्टरांना जास्त पैसे दिले जात नाहीत , परंतू रुग्णांची संख्याच ईतकी जास्त असते की डॉक्टर्सना येथे जास्तीत जास्त शिकण्याची संधी मिळते.


अरविंद आयकेअर मध्ये दररोज सुमारे ८५० ते १००० ऑपरेशन्स होतात.  दरदिवशी सुमारे ६००० पेशंट्स येथे उपचारासाठी आलेले असतात.  ज्यांना पैसे देणे जमत नाही त्यांच्याकडून उपचारासाठी एकही पैसा घेतला जात नाही. याशिवाय त्यांच्यासाठी मोफत राहण्याची आणि जेवण्याची सोय केली जाते. ज्यांना पैसे देणे शक्य आहे त्यांच्याकडून बाजारभावाने पैसे घेतले जातात. दरवर्शी सुमारे ४०% लोक पैसे देऊन आणि ६०% लोक मोफत उपचार करून घेतात. उपचाराची सोय मोफत असली तरी बरेच जण माहिती अभावी किंवा हॉस्पीटल पर्यंत येणे शक्य नसल्याने उपचार करु शकत नाही. त्यांच्यासाठी अरविंदच्या खास बस आहेत. या बस गावोगावी जाऊन तेथे मोफत कँप्स आयोजीत करतात. लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला मोफत दिला जातो. ज्यांना उपचारांची त्वरीत गरज आहे अशा लोकांना बसने थेट मुख्य ईस्पीतळात आणले जाते. एक दिवस प्राथमिक चाचण्या, दुसर्‍या दिवशी ऑपरेशन आणखी दोन दिवस देखभाल करून पाचव्या दिवशी बसने त्यांच्या गावी नेऊन सोडले जाते.


एवढे सगळे करूनही अरविंद आय केअरच्या लक्षात आले की एकुण गरजुंपैकी केवळ ७% लोकांपर्यंत त्यांना पोहोचता येत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी "टेलीमेडीसीन कार"चा वापर केला. या गाड्यांमध्ये बसून अरविंद आय केअरचे तंत्रज्ञ दुरच्या गावांमध्ये जाऊन तेथील लोकांची तपासणी करतात. या सर्व गाड्या सॅटेलाईट द्वारे मुख्य ईस्पीतळाशी जोडलेल्या असतात. टेलीमेडीसीन कार मध्ये तपासणी करून एका कॅमेर्‍याद्वारे रुग्णाचे फोटो घेऊन ते मुख्य ईस्पीतळात पाठवले जातात. मुख्य ईस्पीतळातील तज्ञ डॉक्टर तपासणी करून लगेचच रीपोर्ट बनवून पाठवतात. हा रीपोर्ट टेलीमेडीसीन कार मध्ये प्रींट होतो आणि रुग्णाला लगेचच दिला जातो. यासाठी प्रत्येक रुग्णाकडून केवळ २० रुपये आकारले जातात. इतक्या कमी खर्चात गरजू रुग्णांना त्यांच्या गावात जाऊन उपचार पुरविण्याचा हा प्रकार आगळा म्हणावा लागेल.


मोतीबिंदुच्या ऑपरेशन नंतर डोळ्यात बसविण्याची लेन्स भारतामध्ये कोठेही उपलब्ध नव्हती. परदेशातून  आयात करण्यासाठी लेन्सच्या प्रत्येक जोडीसाठी ३५ डॉलर्स इतका खर्च यायचा. हा प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. वेंकटस्वामी यांनी ऑरोलॅब ची स्थापना केली आणि या लेन्स भारतात सर्वप्रथम यशस्वी पणे बनवल्या त्यादेखील केवळ ५ डॉलर्स इतक्या कमी कीमतीत. आज ऑरोलॅब मधील उत्पादने जगभरातील ८५ देशांमध्ये निर्यात केली जातात. अतीशय कमी खर्चात जास्तीत जास्त ऑपरेशन्स करण्याचे आपले ज्ञान केवळ स्वतः पुरता मर्यादीत न ठेवता अरविंद आय केअरने भारतातील आणि ईतर देशांतील अनेक ईस्पीतळांना हे ज्ञान पुरविण्यास (Consulting) सुरुवात केली.  अरविंद आय केअरने ज्या ईस्पीतळांना मदत केली त्यांची उत्पादकता दुपटीने वाढली.


अरविंद आय केअर ही एक यशस्वी सेवाभावी संस्था असली तरी देखिल तो एक यशस्वी व्यवसाय आहे हे  विसरून चालणार नाही. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा पुरविणार्‍या अरविंद आयकेअरने युनायटेड किंगडम मधील अधिकृतरीत्या प्रकाशित झालेल्या एका रीपोर्टच्या आधारे स्वतःची तुलना UK मधील इस्पीतळांशी केली. यामध्ये असे निष्पन्न झाले की संपुर्ण UK मध्ये जेवढी ऑपरेशन्स होतात त्याच्या ६०% ऑपरेशन्स एकट्या अरविंद आय केअर मध्ये होतात. आणि यासाठी आलेला खर्च हा UK मधील खर्चाच्या केवळ १% इतका आहे. म्हणजेच UK मध्ये जे ऑपरेशन १०० रुपयांत होईल ते ऑपरेशन अरविंद आय केअर मध्ये केवळ १ रुपयांत केले जाईल. असे असले तरी उपचारांच्या गुणवत्ते बाबतीत अरविंद आय केअर UK आणि US मधील इस्पीतळांच्या तुलनेत खुपच उजवे ठरले आहे.
६०% रुग्णांना मोफत सुविधा देउनही दरवर्षी सुमारे ३९% नफा कमावणार्‍या अरविंद आय केअरच्या व्यवसायाचे गणित अनेकांना उलगडले नाही. त्याबद्दल मी तुम्हाला पुढील एक-दोन लेखांअध्ये सांगणार आहेच. प्रचंड ईच्छाशक्ती, स्वच्छ हेतू आणि innovation च्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही हे दाखवून देणार्‍या डॉ.  वेंकटस्वामींचे २००६ मध्ये निधन झाले मात्र त्यांनी सुरु केलेला हा यज्ञ अखंड चालत आहे, चालत राहणार आहे.
मित्रांनो हा लेख वाचल्यानंतर यांपुढे "अशक्य" हा शब्द आपण आपल्या डिक्शनरीतून काढून टाकला पाहिजे. मी आतापर्यंत वाचलेल्या/ऐकलेल्या सर्वाधीक प्रेरणादायी कथांमधील सर्वोत्तम आणि काळजाला भिडणारी ही कथा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल याचा मला विश्वास वाटतो.


या लेखाचा शेवट मी डॉ. वेंकटस्वामींच्याच एका वाक्याने करतो -
“When you grow in spiritual consciousness, we identify with all that is in the world so there is no exploitation. It is ourselves we are helping. It is ourselves we are healing.”अरविंद आय केअरच्या संकेतस्थळाला भेट द्या - http://www.aravind.org 

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


अरविंद आय केअर - एक असामान्य संस्था ! अरविंद आय केअर - एक असामान्य संस्था ! Reviewed by Salil Chaudhary on 11:47 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.