गुगल म्युझिक इंडीया (Labs) - हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा खजिना !

हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या भारतवासियांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण कधीना कधी ईंटरनेटवर गाणी, गाण्याचे बोल, गाणी डाउनलोड (चकट-फू) करण्यासाठीच्या लिंक्स शोधण्यासाठी प्रयत्न केले असतीलच. आपल्या सर्व searches वर नजर ठेवून असणार्‍या गुगल काकांनी हे पाहिले आणि यातुनच खास भारतीयांच्या या संगीतवेडाला उत्तर म्हणून गुगल काकांनी गुगल ईंडीया म्युझिक (Labs) ची सुरुवात केली आहे.

www.google.co.in/music या संकेतस्थळावर गुगल काकांनी नवी-जुनी हजारो हिंदी गाणी रसिकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहेत. या संकेतस्थळावर जाउन हवे ते गाणे सर्च करता येते आणि एका नविन पॉप-अप विंडो मध्ये गाणे चालु करता येते. गाणे डाउनलोड करण्याची किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तसेच कलाकार, गायक, संगीतकार, चित्रपटाचे नाव इत्यादीवरुन गाणे शोधण्याची सोय देखिल यामध्ये आहे.

गुगल ईंडीया म्युझीक हे माझ्यामते एक अप्रतीम बिझनेस मॉडेल आहे. वरवर साध्या-सोप्या दिसणार्‍या या सेवेने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

ग्राहकांचे फायदे -

  • गाण्यांची सीडी विकत घेणे सर्वांनाच शक्य होत नाही , आणि सर्वच गाण्यांच्या सीडी विकत घेणे तर कोणालाच शक्य होत नाही. विकत घेतलेल्या सीडीज सांभाळून ठेवणे, आपल्याला हवे आहे ते गाणे ऐकण्यासाठी योग्य सीडी शोधून काढणे हे त्रासदायक आणि वेळखाउ काम आहे. तसेच डाउनलोड केलेल्या गाण्यांमधून आपल्याला हवे ते गाणे शोधून काढणेही तितकेसे सोपे नसते. गुगल काकांनी सर्व गाणी कलाकार, गायक, संगीतकार, चित्रपटाचे नाव इत्यादीवरुन शोधण्याची सोय पुरविल्यामुळे काही सेकंदातच आपल्याला हवे असलेले गाणे वाजवता येते.
  • या सेवेमध्ये गाण्यांचे live streaming होते. म्हणजे गाणे किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. यामुळे संगणकातील महत्त्वाची आणि महागडी मेमरी स्पेस वाया जात नाही. तसेच डाउनलोडींगसाठीचा वेळही वाया जात नाही. सर्व काही चुटकीसरशी उप्लब्ध होते !
  • मुख्य म्हणजे गुगलच्या इतर सर्व सेवांप्रमाणेच ही सेवा देखिल सर्वांसाठी पुर्णपणे मोफत आहे.
  • गाणी ऐकण्याची सोय ऑनलाईन असल्यामुळे जगात केव्हाही आणि कोठूनही (जिथे संगणक आणि इंटरनेट उपलब्ध आहे) गाण्यांचा आनंद लुटू शकतो.

गुगलचे फायदे -

  • गुगलकाकांनी यासाठी सारेगामा. इन्.कॉम आणि सावन्.कॉम या भारतीय वेबसाईट्सशी संगनमत केले आहे. गाण्यांचे इंटरनेट प्रसारणांचे हक्क या भारतीय वेबसाईट्सने विकत घेतलेले असतात. त्यामुळे गुगल काकांना ही गाणी विकत घ्यावी लागत नाहीत तसेच ही गाणी आपल्या सर्वर्स (Servers) वर होस्ट करावी लागत नाहीत.
  • प्रत्येक गाणे एका नविन विंडो मध्ये चालु होते आणि या प्रत्येक विंडोमध्ये गुगलतर्फे जाहिराती दाखविल्या जातात. जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न वर दिलेल्या भारतीय साईट्सबरोबर वाटून घेतले जाते.
  • तिसरा आणि गुगल साठी सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्व हिंदी गाणी आता गुगलच्या शोध यंत्रणेमध्ये समाविष्ट झालेली आहेत. लाखो-करोडो भारतीय दररोज वेगवेगळ्या गाण्यांचा गुगलवर शोध घेऊन इतर साईट्सवर जात होते ते आता पुन्हा गुगलच्याच गुगल ईंडीया म्युझीक या संकेतस्थळाकडे वळवले जातात. त्यामुळे इंटरनेटवर गाणी शोधणारे ८०% पेक्षा जास्त ग्राहक गुगलकडेच राहतात आणि त्यांना गुगलतर्फे दाखविल्या जाणार्‍या जाहिराती पहाव्या लागतात.
  • म्हणजे अत्यंत कमी खर्चात गुगलने जाहिरातदारांना आकर्षीत करणारे काही करोड भारतीय ग्राहक आपल्या मुठीत ठेवले आहेत.

वर दिलेल्या दोनही फायद्यांपेक्षा अतीशय महत्त्वाचा आणखी एक फायदा आहे. गुगल तर्फे ऐकवले जाणारे हे संगीत पुर्णपणे कायदेशीर आहे. यामुळे संगीत क्षेत्राला music piracy (संगीत चौर्य) पासून मुक्ती मिळणार आहे. आपणही एक सजग नागरीक म्हणून नक्कीच कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन मताचाआपल्या आवडत्या संगीताचा मनमुराद आनंद लुटू शकतो.


यामध्ये प्रामुख्याने हिंदी गाण्यांचा समावेश केलेला असला तरी काही मराठी आणि तमिळ गाणी देखिल ऐकता येतात. सध्या प्रायोगीक तत्त्वावर सुरु केलेल्या या सेवेमध्ये गुगलकाका नक्कीच खुप सुधारणा करतील.

तेव्हा मित्रांनो गाणी शोधण्यासाठी वेळ वाया न घालवता आजच www.google.co.in/music ला भेट द्या आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

गुगल म्युझिक इंडीया (Labs) - हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा खजिना ! गुगल म्युझिक इंडीया (Labs) - हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा खजिना ! Reviewed by Salil Chaudhary on 00:24 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.