कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय व कसे करावे?आपण साधा चाट मसाला विकत आणला तर त्यावर आलू चाटची पाककृती मागे लिहिलेली असते. लोणची मसाल्यांचेही तसेच. आणि कुकर घेतला तर पूर्ण पाककृतींचे पुस्तकच विनामुल्य मिळते. आपल्याला स्वयंपाक येत नसला तरी अगदी मोजक्या शब्दांत, सहज मिळालेली ही पाककृतींची मदत सुखावणारी असते. शिवाय, वेगवेगळ्या पदार्थांच्या, लोणच्यांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि पटकन खायची इच्छा होईल अशा प्रतिमापण त्या छोट्याशा पाकिटावर लिहिलेल्या असतात. आणि आपण अगदी ५-६ सेकंद विचार करून ते उत्पादन घेतोसुद्धा. हे सगळे काय आहे? आपल्याला मदत करणाऱ्या पाककृती, भुरळ पाडणाऱ्या प्रतिमा?

हेच आहे कंटेंट मार्केटिंग – ग्राहकोपयोगी माहितीचे वितरण करून साधलेले विपणन.

पण हे झाले अगदीच पारंपरिक पद्धतीचे कंटेंट मार्केटिंग. आजच्या काळात सर्व वयोगटांतील लोकांचा जास्तीत जास्त वेळ इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडिया व विविध अॅप्स् यांवरच जातो. अर्थातच, विविध लहानमोठ्या व्यवसायांना त्यांचे संभाव्य ग्राहक मिळविण्यासाठी कंटेंट मार्केटिंग ऑनलाइन जगातच प्रामुख्याने करावे लागते.

आज आपण कंटेंट मार्केटींगचे आव्हानात्मक तरीही रंजक विश्व बघुयात.

कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय?

कंटेंट मार्केटिंग म्हणजे आपल्या उत्पादनाशी संबंधित किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती विविध स्वरुपांत विविध मिडियावर उपलब्ध करून देणे. पण ही माहिती प्रत्यक्ष विक्रीसंबंधित नसावी. म्हणजे सतत आपल्या उत्पादनाची जाहिरात नसावी. रोजच्या जीवनात आपल्याला कुठल्याही विषयासंबंधी छोटी मोठी समस्या निर्माण झाल्यास आपण पटकन गुगल उघडतो, आपली समस्या शोध चौकटीत लिहून शोध घेतो. परिणामांमध्ये जे संकेतस्थळ आपल्याला आवश्यक माहिती देईल, ते आपल्याला आवडते. कंटेंट मार्केटिंगमध्ये आपल्याला हेच करायचे आहे. कंटेंट म्हणजे अशी माहिती लोकांना सहज उपलब्ध करून द्यायची, जी उपयुक्त ठरेल. एखादा ब्रँड जेव्हा उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देऊ लागतो, तेव्हा लोक त्या ब्रँडशी मनाने जुडतात. आणि अर्थातच, आपल्या उत्पादनाची किंवा सेवांची जाहिरात बघताच किंवा बघण्याआधीही आपल्या उत्पादनांकडे आकर्षित होतात. स्वत: कंपनीच्या विविध सेवा आणि उत्पादनांची माहिती घेतात आणि उपयुक्त माहितीमुळे आधीच निर्माण झालेल्या विश्वासाने आपल्या आवडत्या ब्रँडचेच उत्पादन घेणे पसंत करतात.
  

कंटेंट मार्केटिंग नीती कशा ठरवाव्यात?

माझ्या मते मार्केटिंग म्हणजे आपल्या ग्राहकांना जाणणे. इतकेच. त्यासाठी लोकांशी चर्चा, संवाद साधणे फार आवश्यक ठरते. त्यावर खर्च होतो, पण संवाद साधल्याने जो विश्वास निर्माण होतो, तो केवळ जाहिरातींनी होणे शक्य नाही. आणि आपला संवाद सुरु होतो उत्कृष्ट कंटेंटने.

ग्राहकोपयोगी माहितीचे विविध प्रकार आहेत, लेख, संबंधित बातम्या, प्रश्नोत्तरे, श्वेतपत्रे, ई बुक्स, विडीओज, इन्फोग्राफिक्स, प्रतिमा, ग्राहक – प्रतिक्रिया.

कंटेंट मार्केटिंग करताना सर्वांत महत्त्वाची बाब ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, की माहिती प्रसारित करून साधले जाणारे आपले ध्येय. आपण माहिती प्रसृत करतो, तेव्हा येणारा खर्च, वेळ आणि त्यापासून आपल्याला किती व्यवसायवृद्धी हवी आहे. त्याचे स्पष्ट लक्ष्य ठरवून मगच कंटेंट नीती ठरवावी. परिणामांचे नियमित अवलोकन करावे आणि पुढे आवश्यक ती नीती ठरवीत जावी.

कंटेंट मार्केटींगची विविध माध्यमे:


सोशल मिडिया मार्केटिंग: सोशल मिडिया विनामुल्य असल्यामुळे, तांत्रिक दृष्ट्या वापर सहज सोपा असल्याने सर्व वर्गांतील लोक सोशल मिडीयावर माहिती वाचतात, शेयर करतात आणि अर्थातच आपली मते बनवितात. तरीही, सर्वच व्यवसायांसाठी, सर्व सोशल मिडिया वाहिन्या आवश्यक नाहीत. कंटेंट मार्केटिंग नीती ठरविण्यापूर्वी आपले संभाव्य ग्राहक, कुठल्या सोशल साईटवर मुख्यत: सक्रीय आहेत हे बघावे. आणि त्या वाहिनीवरच आपले माहिती प्रसारित करण्याचे, फोलोअर्स मिळविण्याचे लक्ष केंद्रित करावे.
  
संकेतस्थळ व ब्लॉग: जेव्हा ग्राहक समस्या सर्च इंजिनवर शोधतात, त्यावेळी परिणाम मुख्यत: संकेतस्थळे किंवा ब्लॉग्स असतात. उदा: वैद्यकीय समस्या किंवा विविध मोबाईल फोन, संगणक, स्मार्टफोन यांची परीक्षणे. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा विषय जर सर्च इंजिनवर अधिक शोधला जात असेल, तर आपण लेख, मार्गदर्शनपर ब्लॉग, प्रश्नोतरे या माध्यमांतून कंटेंट मार्केटिंग करू शकतो.       

ध्वनिचित्रमुद्रणे: युट्युबवर विडीओ अपलोड करणे अगदी सोपे आहे. वाचण्यापेक्षा विविध विषयांवरची माहिती ऐकणे आणि बघणे, कुणी समजावून सांगणे हे बऱ्याच ग्राहकांना आवडते आणि ते काही विषयांच्या बाबतीत उपयुक्तसुद्धा ठरते, उदा. पाककृती, तांत्रिक समस्या निराकरण (Troubleshooting)  

ईमेल मार्केटिंग: आपल्या आवडत्या विषयाची माहिती थेट इनबॉक्समध्ये मिळण्याने शोध करण्याचा वेळ वाचतो. आपण जी ग्राहकोपयोगी माहिती देत असाल ती ईमेलद्वारे संभाव्य ग्राहकांना सबस्क्राइब करायला प्रेरित करा. ग्राहकांच्या समस्यांना ईमेल किंवा थेट चर्चेद्वारे (chat) उत्तरे द्या.     
माहिती प्रसारित करण्यापूर्वी त्याचे वेळापत्रक बनवा आणि ठराविक कालावधीने माहिती ग्राहकांसमोर सादर करा.  

~~ सार ~~

इंटरनेट क्रांतीमुळे कंटेंट मार्केटिंग खूप सोपे झालेय पण म्हणूनच स्पर्धात्मकसुद्धा. आजपासूनच 
आपल्या मार्केटिंग नीतीमध्ये कंटेंट मार्केटिंग समाविष्ट करा.

आपल्या व्यवसायासंबंधी विषयाची माहिती प्रसारित करण्यापूर्वी तीन प्रश्नांवर विचारमंथन करा आणि यशाच्या या नव्या वाटेवर चालणे सुरु करा.

कंटेंट मार्केटिंग: कुठे, काय आणि केव्हा!  


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय व कसे करावे? कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय व कसे करावे? Reviewed by Salil Chaudhary on 05:17 Rating: 5
Powered by Blogger.