धीरूभाई अंबानी यांचे व्यवहार आणि व्यवसाय चातुर्य आपणा सर्वाना माहित आहेच. दडून बसलेली संधी शोधणे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करून त्यातून नफा मिळवण्याची धीरुभाईंची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी होती. धीरुभाईंच्या या हुशारीचे एक उदाहरण नुकताच वाचनात आले. ते असे...
गोष्ट आहे १९५० सालची. तेव्हा धीरूभाई येमेन या देशात नोकरी करत होते. त्या काळात येमेन सरकारच्या अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्याना एक विचीत्र गोष्ट लक्षात आली. येमेनचे चलन असलेल्या रियालची (Rial) नाणी झपाट्याने लुप्त होत होती. ही नाणी अचानक कुठे जाऊ लागली याचा त्यांनी शोध सुरु केला. काही दिवसांनंतर त्यांचा लक्षात आले की सर्व नाणी येमेन मधील आदेन या शहरातून अदृश्य होत आहेत. आणखी चौकशी केली असता त्यांना कळले की धीरूभाई नावाचा एक भारतीय कारकून बाजारातून ही नाणी चलनाच्या किमतीपेक्षा जास्त भाव देऊन विकत घेत होता.
धीरूभाई तेव्हा जेमतेम २० वर्षांचे होते. त्यांच्या लक्षात आले होते की येमेनचे चलन असलेले रियाल हे नाणे चांदीचे होते. आणि चलनी बाजारात असलेल्या या नाण्याच्या ब्रीटीश पौंडामधील किमतीपेक्षा , तेवढयाच वजनाच्या चांदीची किमत अधिक होती. धीरुभाईंनी नाणी बाजारातून जास्त भावाने खरेदी केली आणि नंतर ती नाणी वितळवून धातूच्या बाजारात जास्त भावाने विकली.
केवळ तीन महिन्यात या सर्व व्यापातून धीरुभाईंनी त्याकाळी काही लाखांचा फायदा कमावला होता. पुढे सरकारच्या लक्षात आल्यावर धीरुभाईंनी हा उपद्व्याप थांबवला पण आपल्या व्यवहार चातुर्याची चुणूक मात्र त्यांनी दाखवून दिली होती.
(नेटभेट वरील हा आणि इतर अनेक माहितीपूर्ण लेख आपल्याला आवडले असल्यास कृपया हा ज्ञानयज्ञ सुरु ठेवण्यासाठी आम्हास मदत करा. धन्यवाद)
धीरूभाई अंबानीच्या व्यवसाय चातुर्याची गोष्ट
Reviewed by Salil Chaudhary
on
05:32
Rating:
