C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग १

नमस्कार वाचकहो, संगणक वापरताना १० पैकी ६ वेळा संगणक हळू काम करण्याची आपली तक्रार असते. संगणक गोठणे (हँग होणे) किंवा दिलेल्या आदेशांवर अतिशय हळू प्रक्रिया करणे (लॅग होणे) हे त्याचेच प्रकार आहेत. सगळेच संगणक काही कमी क्षमतेचे नसतात मग तरी देखील बहूतेक संगणकांमध्ये हा दोष का आढळतो? ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आपण संगणकाची घेत नसलेली (किंवा घेत असलेली अपुरी) देखभाल हे आहे.

C Cleaner संगणकाचा डॉक्टर - Netbhet.com


एखादी गोष्ट (अगदी मानवी शरीर सुद्धा) जर पूर्ण क्षमतेवर वापरायची असल्यास ठराविक कालांतराने त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे मग संगणक तरी त्याला अपवाद कसा असेल?. ज्याप्रमाणे संगणकाचे हार्डवेयर स्वच्छ करणे आवश्यक असते तसे सॉफ्टवेयर (ऑपरेटिंग सिस्टीम आणी इतर जागा) देखील स्वच्छ करणे आवश्यक असते. बरेचसे प्रोग्राम्स किंवा संकेतस्थळे आपल्या संगणकावर संगणकासाठी अनावश्यक फाईल्स डाउनलोड करतात (उदा- कुकीज) सगळाच व्हायरस असतो असे नाही, बहुतेक फाईल्स ह्या  व्हायरसच्या तुलनेत निरुपद्रवी पण अनावश्यक अशा असतात, किंवा एखादे सॉफ्टवेयर प्रस्थापित (Install) करताना अजून एक वेगळे सॉफ्टवेयर प्रस्थापित केले जाते (पहिले सॉफ्टवेयर प्रस्थापित करताना त्याची परवानगी रद्द करावी लागते म्हणजे Install AOL Toolbar किंवा अश्या कोणत्याही सॉफ्टवेयरला आधीपासूनच टिक केलेली असते ती आपण काढली नाही  तर टूलबार वैगेरे सारख्या गोष्टी देखील मूळ सॉफ्टवेयर बरोबर प्रस्थापित होतात). हा झाला संगणकामध्ये कचरा साठण्याचा एक प्रकार अशाच प्रकारे अनेक पद्धतीने आपण संगणक जसजसा वापरतो तसा थोडा थोडा कचरा त्यात वाढत जातो.

पिरीफॉर्म ह्या संगणकासाठी उपयुक्त सॉफ्टवेयर्स बनवणाऱ्या कंपनीने तयार केलेल्या “सी क्लीनर” (C Cleaner) ह्या सॉफ्टवेयरमार्फत आपण संगणकामधील अनावश्यक आणी जागा व्यापणार्यार फाईल्सना काढून टाकू शकतो. या आधी पिरीफॉर्मने तयार केलेल्या रिकुव्हा ह्या सॉफ्टवेयर बद्दल आपण माहिती घेतली आहे ज्यातून आपण डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळवू शकतो. आज आपण संगणकामध्ये साठलेल्या अनावश्यक फाईल्सची (म्हणजे थोडक्यात कचरा) स्वच्छता कशी करता येते त्याबद्दल माहिती घेऊयात.

१) सर्वप्रथम ह्या अधिकृत दुव्यावरून सी.क्लीनरची सर्वात नवीन आवृत्ती संगणकावर उतरवून घ्या. (जवळपास ६ एम.बी)
          - किंवा मग Filehippo या संकेतस्थळावरूनही हे सॉफ्टवेयर घेऊ शकतो.

२) खाली दिलेल्या चित्रात तुम्हाला सी.क्लीनर कसा प्रस्थापित करावा आणी कसा वापरावा याबद्दल माहिती मिळेल.
सी.क्लीनर सुरु केल्यावर तुम्हाला प्रामुख्याने खालीलप्रमाणे ४ पर्याय दिसतील (डाव्या बाजूला उभे आयकॉन्स). इथे त्या पर्यायांबद्दल माहिती दिली आहे.
१) क्लीनर (Cleaner) – अर्थातच नावाप्रमाणे हे सी.क्लीनरचे प्रमुख हत्यार आहे. सॉफ्टवेयर्सच्या पिढ्यानपिढ्या जो कचरा करतात तो काढण्याचे काम क्लीनर (Cleaner) हा पर्याय करतो. यात तुम्हाला दोन उप-पर्याय दिसतील ते म्हणजे विंडोज आणी एप्लिकेशन्स. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे विंडोजशी संबंधित कचरा इथून स्वच्छ करता येतो इंटरनेट एक्प्लोरर, विंडोज एक्स्प्लोरर सिस्टीम आणी एडव्हान्स (इतर) हे त्यात समविष्ट आहेत आणी एप्लिकेशन्स ह्या पर्यायातून संगणकावर प्रस्थापित केलेल्या एप्लिकेशन्सचा कचरा काढून टाकता येतो. सी.क्लीनर कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत असाल तर सर्वच पर्याय निवडणे योग्य ठरेल (यामुळे तुम्ही ब्राउझर मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड, हिस्टरी वैगेरे देखील जातील, ते नको असेल तर हिस्ट्री आणी सेव्हड पासवर्ड सोडून इतर चौकोनांवर टिक करा). शेवटचा वाईप फ्री स्पेस हा पर्याय म्हणजे संगणकातील डिलीट केलेल्या फाईल्स कायमच्या मिटवून टाकणे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर रिसायकल बिन मधून डिलीट झालेल्या फाईल्स दफन होतात ज्यांना रिकुव्हा हे सॉफ्टवेअर उकरून काढू शकते पण “वाईप फ्री स्पेस” हा पर्याय त्यांची पूर्ण विल्हेवाट लावतो त्यामुळे त्या खर्या अर्थाने संपूर्ण डिलीट होतात. वाईप फ्री स्पेस हा पर्याय उपयुक्त असला तरी तसा वेळ खाऊ आहे त्यामुळे हा उपपर्याय ६ महिन्यातून एकदा वापरला तरी हरकत नाही. क्लीनर हा पर्याय कसा वापरावा यासाठी खालील चित्र पहा.

C Cleaner संगणकाचा डॉक्टर - Netbhet.comमाझी संगणक प्रणाली विंडोज ७असल्यामुळे विंडोज एक्स.पी वर थोडं वेगळं दिसेल पण प्रक्रिया हीच आहे.

२) रजीस्ट्री (Regisry) – हा पर्याय संगणकात असलेल्या रजीस्ट्री फाईल्सच्या समस्या म्हणजे एखाद्या सॉफ्टवेयरला येणारी रजिस्ट्रेशनशी संबंधित तक्रार किंवा सॉफ्टवेयर प्रस्थापित न होणे इत्यादी गोष्टी सुरळीत करण्यासाठी दिला आहे. हा पर्याय स्वतःच समस्या शोधून काढतो आणी आपल्याला दाखवतो आपण त्यातील सर्व किंवा निवडक समस्या निवडून त्या ठीक करू शकतो. रजीस्ट्री (Regisry) क्लीनर आपल्या कुठल्याही सॉफ्टवेअरला धक्का न लावता अनावश्यक नोंदी काढून टाकतो रजीस्ट्री (Regisry) हा पर्याय कसा वापरावा यासाठी वरील चित्र पहा.

आज आपण हे दोन पर्याय वापरून पहिले, एकदा रिस्टार्ट केल्यानंतर तुमचा संगणक आता बऱ्यापैकी वेगवान झालेला जाणवेल. सी क्लीनर मध्ये याहूनही अधिक डुप्लिकेट फाईल फाईंडर, स्टार्ट अप प्रोग्राम्स, ड्राईव्ह वायपर सारख्या सुविधा आहेत ज्या आपण पुढील भागात पाहुयात. काही शंका असल्यास किंवा अडचण उद्भवल्यास इथे नक्की मांडा.

+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग १ C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग १ Reviewed by Salil Chaudhary on 23:05 Rating: 5
Powered by Blogger.