बिझनेस्य कथा रम्यः - अ‍ॅपलची अनोखी स्ट्रॅटेजी !

कंप्युटर्स, म्युझीक आणि मोबाईल या क्षेत्रांचा कायापालट केल्यानंतर आता अ‍ॅपलने आपले लक्ष "ऑटोमोबाईल" म्हणजे वाहन उद्योगाकडे वळवले आहे. होय, अ‍ॅपल कंपनी आता एक अशी कार बनवणार आहे जी आपला कार कडे बघण्याच्या आणि कार वापरण्याच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल करणार आहे. नजिकच्या भविष्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात खुप बदल होणार आहेत आणि माझ्या मते याची सुरुवात अ‍ॅपलची ही आगामी कार करेल.

एवढच नव्हे तर नुकताच अ‍ॅपलने चीनमधील सर्वात मोठ्या डीडी डाचे (Didi Dache) या "राईड शेअरींग" कंपनी मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. ही कंपनी म्हणजे जगातील सर्वाधीक वेगाने वाढणारी कंपनी "उबर(UBER)" ची चायनीज आवृत्ती आहे. या कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यामागे अ‍ॅपलची मोठी खेळी आहे.

अ‍ॅपल आय-फोनच्या एकुण मिळकतीपैकी २५% कमाई ही चीन मधून होते. आणि आता चीनचे मोबाईल मार्केट हळूहळू संथ होत आहे. याचा अ‍ॅपलच्या मिळकतीवर खुप मोठा परीणाम होऊ शकतो. तसेच चीनने जाणीवपुर्वक परदेशातील कंपन्यांना मागे सारून त्याऐवजी चीनमधील कंपन्यांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. गुगल,फेसबुक या कंपन्यांना चीनमधून काढता पाय घ्यायला लागला आहे. अ‍ॅपलसोबत असे होऊ नये म्हणून आधीच अ‍ॅपलने चीनमधील एका महत्त्वाच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केली.

डीडी डाचे या कंपनीमध्ये अलिबाबा, टेन्सेंट, सीआयसी या मोठ्या चायनीज कंपन्यांची गुंतवणुक आहे आणि अप्रत्यक्षपणे अ‍ॅपल आता या मोठ्या कंपन्यांची भागीदार झाली आहे. भविष्यात चायनीज गवर्नमेंट सोबत वाटाघाटी करण्यासाठी अ‍ॅपल या मोठ्या कंपन्यांचा खुप फायदा होणार आहे.

डीडी डाचे ही कंपनी अतीप्रचंड वेगाने वाढते आहे. (चार वर्षात शुन्यापासून २५ बिलियन अमेरीकन डॉलर्स !!). या कंपनीच्या गाड्यांमध्ये भविष्यात अ‍ॅपलचे फोन विकले जातील, तसेच ड्रायवर्स अ‍ॅपल वॉच वापरतील. आणि एवढच नव्हे तर अ‍ॅपलची आगामी कार विकली जाण्यासाठी एक प्रचंड मोठा ग्राहक अ‍ॅपलने आताच आपल्या खिशात टाकला आहे.

उबर या कंपनीमध्ये गुगल आणि अ‍ॅमेझॉनची बरीच गुंतवणुक आहे. तेव्हा डीडी डाचेमध्ये गुंतवणुक करुन अ‍ॅपलने या दोन मोठ्या स्पर्धकांना टक्कर दिली आहे. उबर आणि गुगल देखिल आधीपासूनच स्वयंचलीत वाहन बनवण्याच्या स्पर्धेत आहेत. भविष्यामध्ये या दोनही कंपन्या अ‍ॅपलच्या कारसोबत स्पर्धा करतील. त्याची तयारीही अ‍ॅपलने आताच सुरु केली आहे.

एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची अ‍ॅपलची ही "मास्टर स्ट्रोक" खेळी निश्चीतच फार रंजक आहे.

मित्रांनो, अ‍ॅपलची ही स्टोरी आपल्याला भरपुर काही शिकवते. "स्ट्रॅटेजी" म्हणजे काय हे अतीशय रंजकपणे समजावणारी ही स्टोरी म्हणूनच मी ईथे लिहिली.  व्यवसाय करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या माझ्या वाचक मित्रांना ही स्टोरी मला आवर्जून सांगाविशी वाटली.

जगातील सगळ्यात बलाढ्य आणि श्रीमंत असलेल्या अ‍ॅपल सारख्या कंपनीला देखिल काळाची पावलं ओळखुन त्यानुसार वागावं लागतं. मग आपण असं वागतो का? आपल्या उत्पादनात, आपल्या कस्टमर्समध्ये, विक्री करण्याच्या पद्धतीमध्ये, आणि मार्केटमध्ये होऊ घातलेले बदल आपण नीट पाहतोय का ? दर महिन्याला किंवा दर तिमाहीला होणारा सेल्स, प्रॉफीट एवढ्यावरच लक्ष देणारा व्यवसाय कधीही अकस्मात संपू शकतो. तसा तो संपू देऊ नका. व्यवसायाकडे स्ट्रॅटेजीकली पहायला शिका.

उद्याच युद्ध जिंकायचं असेल तर कालपासूनच त्याची करायला पाहिजे, नाही का?

सलिल चौधरी
www.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

बिझनेस्य कथा रम्यः - अ‍ॅपलची अनोखी स्ट्रॅटेजी ! बिझनेस्य कथा रम्यः - अ‍ॅपलची अनोखी स्ट्रॅटेजी ! Reviewed by Salil Chaudhary on 08:27 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.