रामभाऊ - उद्योग त्यांना कळला हो !


(हा लेख TEDxGateway च्या फेसबुक वॉलवर आहे. नेटभेटच्या वाचकांकरीता याचे मराठीत भाषांतर करत आहे)
मित्रांनो हा फोटो आहे रामभाऊंचा. ते माझ्या घरातील बगीच्याची देखरेख करतात.
४ वर्षांपुर्वी माझ्या घराजवळच्या रस्त्यावर माती खणत असलेल्या रामभाउंना , माझ्या घराचं बांधकाम करणार्‍या साईट इंजीनीअरने बगीचाच्या देखभालीचं काम करणार का ? असं विचारलं. आणि रामभाउंनी एक सेकंदही वाया न घालवता होकार दिला. किती पैसे, किती काम याची काहीच चिंता न करता त्यांनी काम स्वीकरलं. जवळजवळ फुकटच त्यांनी माझ्या गार्डनचं काम केलं.
पण नंतर त्यांनी माझ्या घराचं गार्डन एक उदाहरण म्हणून आजुबाजुच्या इतर घरांना दाखवलं आणि इतरांचीही कामं मिळविली. २ वर्षांतच त्यांना आसपासच्या २० घरांची कामं मिळाली होती. तोपर्यन्त त्यांनी एक बाईक विकत घेतली होती. ३-४ हेल्पर्स, ते स्वतः आणि त्यांची बायको गार्डनींगचं काम करत होते.
काही दिवसांनंतर त्यांनी मला सांगीतलं की त्यांनी त्यांच्या मुलासोबत वाहतुकीचा व्यवसाय सुरु केलाय. एक छोटा टेंपो त्यांनी डीलीव्हरी साठी घेतला होता. तसेच त्यांना आमच्या कॉम्प्लेक्सच्या बिल्डरच्या स्वतःच्या बंगल्याच्या बगिच्याचं काम देखिल मिळालं होतं. अर्धा एकर पसरलेल्या या गार्डन मध्ये ते मला घेऊन गेले आणि तिथे ते करत असलेलं काम मला दाखवलं.
लवकरच त्या बिल्डरने पुर्ण कॉम्प्लेक्सच्या झाडांचं व बागबगिच्यांच काम रामभाउंना सोपवलं. त्यांचा डीलीव्हरीचा व्यवसायही चांगला सुरु होता आणि एव्हाना त्यांनी २-३ टेंपो आणि १५ माणसं कामाला ठेवली होती.
आज ते माझ्या गार्डनमध्ये काही झाडांची पुनर्रचना करण्यासाठी आले होते. ते येताना स्वतःच्या होंडा सिविक मधून आले. आणि इतर कामगारांसोबत स्वतः कामाला लागले. माती खणणं, मुळांसहित झाडं बाहेर काढणं, ती नव्याने लावणं अशी सर्व कामं ते करत होते. त्याचेच हे फोटो आहेत.
त्यांचा चार वर्षांचा हा प्रवास बघून मी थक्क झालो. त्यांना जरी मी काम दिलं असलं तरी आज माझ्याकडेही त्यांच्यासारखी कार नाही. ते आमची ऑर्डर एकतात आणि मनापासून काम करतात. जरी ते आमच्यापेक्षा जास्त पैसे कमवत असले तरी ते अतिशय नम्र आहेत आणि ग्राहकसेवा त्यांच्या अंगातच भिनलेली आहे.
रामभाऊ पन्नाशीचे आहेत. वयाच्या चाळीशी पर्यंत ते कंत्राटी कामगार होते. जरी उद्योजकता त्यांच्या अंगात होती, तरी परीस्थीतीमुळे ती अडकून पडली होती. एक छोटीशी संधी मिळताच, त्यांच्या मधली उद्योजकता उफाळून बाहेर आली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं.
नोबेल पारितोषिक विजेते, ग्रामीण बँकेचे संस्थापक श्री मोहम्मद युनुस एकदा म्हणाले होते, " की गरीब लोक हे बोन्साय झाडासारखे असतात. मोठ्या झाडाचं आणि बोन्साय (लहान) झाडाचं बीज सारखंच असतं. फरक असतो तो त्यांना वाढविताना पुरविलेल्या परीस्थीतीमध्ये. त्यांच्या बियाण्यामध्ये खोट नसते. पण समाज त्यांना पुरक, पोषक वातावरणच मिळू देत नाही."
रामभाउंनी मात्र बोन्साय बनून जगण्याला नकार दिला. स्वतःच्या बळावर आणि हिंमतीवर ते मोठे बनले. त्यांना कोणत्या बँकेकडून लोन घेता आलं नाही, मॅनेजमेंटचं शिक्षण मिळालं नाही.
रामभाउंनी सिद्ध केलंय की जबरदस्त ईच्छाशक्ती आणि कर्तुत्व अंगी असलं की शेकडो मार्ग आपोआप तयार होतात - भांडवल असो अथवा नसो, शिक्षण असो वा नसो !
मूळ लेखाची लिंक -https://www.facebook.com/TEDxGateway/posts/1071852436201670:0

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

रामभाऊ - उद्योग त्यांना कळला हो ! रामभाऊ - उद्योग त्यांना कळला हो ! Reviewed by Salil Chaudhary on 05:24 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.