नाहीतर आज पेटीएम अस्तित्वातच नसती | Paytm success story | Marathi Motivational Business Story

१९९८ साली जेव्हा गुगल स्थापना झाली त्याच वर्षी इकडे भारतात एक माणूस सर्च इंजिन वर काम करत होता.

गुगलच्या गॅरी आणि सर्गी यांना गुंतवणूक मिळवून देण्यासाठी मदतही "राजीव मोटवानी" या भारतीय वंशाच्या माणसानेच केली. ती मदत दुर्दैवाने तेव्हा भारतातील सर्च इंजिनवर काम करणार्‍या व्यक्तीला मिळाली नाही.

बिझनेस केला तर लग्नासाठी मुलगी मिळणार नाही या त्याच्या पालकांच्या तगाद्याला कंटाळून त्याने शेवटी नोकरी केली.

पण्.....पण..........

त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून आला, पुन्हा नोकरी सोडून नवा बिझनेस त्याने सुरु केला.......त्यातही फायदा झाला नाही...

पण्.....पण...........

त्याने हार मानली नाही. ८ वर्ष संघर्ष केल्यानंतर त्याचा बिझनेस यशस्वी झाला.

मित्रांनो, त्या उद्योजकाचं नाव आहे विजय शेखर शर्मा.........त्याच्या कंपनीचं नाव.....वन९७ कम्युनिकेशन्स जिला आपण पेटीएम नावाने ओळखतो.

विजय शेखर शर्मा एकदा काही गुंतवणुकदारांना भेटण्यासाठी चीन मध्ये गेला होता. तिथल्या एका दुकाना मध्ये खरेदी करताना त्याच्या लक्षात आले की काउंटरवर पैसे भरण्यासाठी प्रचंड मोठी रांग होती आणि तरीसुद्धा ती रांग अत्यंत वेगाने पुढे जात होती. तिथे काउंटर वर त्याने पाहिले की कोणीही कॅश देत नव्हते तर फक्त आपला मोबाईल कॅशीअरला दाखवत होते. कॅशीअर एका स्कॅनरच्या सहाय्याने मोबाईल मधील QR कोड स्कॅन करायचा आणि आपोआप पैसे भरले जायचे.

त्याच्यातल्या उद्योजकाला मनोमन जाणवलं की प्रश्न भारतात पण आहे आणि तो सोडवला जाऊ शकतो.

भारतात परत आल्यावर लगेचच त्याने आणि त्याच्या टीमने असं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर बनवलं.

पण्......पण......

जेव्हा हे तंत्रज्ञान घेवून तो दुकानदारांकडे गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की कुणालाही आपल्या दुकानात एक आणखी मशिन ठेवायची नाही. त्यासाठी लागणारी गुंतवणुक, जागा, विजेचे बिल भरायला दुकानदार तयार नव्हते. आणि एका अनोळखी मशीन वर पैसे भरायला ग्राहक तयार नव्हता. (क्रेडीट कार्ड मशिन प्रसिद्ध बँकेच्या असतात त्यामुळे ग्राहकांना जास्त भीती नसते)

पुन्हा एकदा विजय शर्माने शक्कल लढविली आणि हे पुर्ण बिझनेस मॉडेल १८० अंशात फिरविलं आणि दुकानदारांना फक्त QR कोड असलेलं स्टीकर दुकानात लावायला सांगितलं. आणि पेमेंटचं अ‍ॅप ग्राहकांच्या मोबाईल वर दिलं. म्हणजे किती पैसे द्यायचे ते ग्राहक स्वतः आपल्या फोनमध्ये लिहू लागला त्यामुळे ग्राहक निश्चींत झाले.

दुकानदारांनी याला नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं. या स्टीकर च्या कल्पने मुळे आपोआपच त्यांचं ब्रँडींगही होउ लागलं.

तोपर्यंत पेमेंट वॉलेट फक्त इकॉमर्स, ऑनलाईन बुकींग इत्यादींसाठी वापरलं जायचं, पण विजयने वॉलेट ऑफलाईन जगासाठी, दुकानांमध्ये वापरायला आणलं आणि ही एकमेव चाल पेटीएम साठी मोठी संजीवनी ठरली. कारण जेव्हा नोटबंदीच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहारांसाठी फक्त पेटीएम हा एकच पर्याय पुर्णपणे तयार होता.

विजय शेखर शर्मा हा माणूस भारतातला दुसरा धिरुभाई अंबानी होणार आहे असं माझं भाकित आहे. त्याची स्वप्न आणि त्याची भूक खूप मोठी आहे. खर्‍या अर्थाने जागतिक ब्रँड बनण्याची क्षमता पेटीएम कडे नक्कीच आहे.

विजय शर्मा सुरुवातीला तोट्यात होता , पैशांची चणचण होती त्यावेळी त्यातून बाहेर कसा पडला याची कथा अतिशय रोचक आहे. ति सांगणारा एक व्हीडीओ आम्ही आधी बनविला होता. हा व्हीडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्ही खचले असाल, बिझनेस मध्ये अडचणी असाल तर नव्याने उभं राहण्याची प्रेरणा जरुर देईल.


मित्रांनो, या गोष्टीमध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे. तुम्हाला यातून काय शिकता आलं ते खाली कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा.

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नाहीतर आज पेटीएम अस्तित्वातच नसती | Paytm success story | Marathi Motivational Business Story नाहीतर आज पेटीएम अस्तित्वातच नसती | Paytm success story | Marathi Motivational Business Story Reviewed by Salil Chaudhary on 04:07 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.