अ‍ॅपल - शेअर मार्केट मध्ये १ ट्रीलीयन डॉलर्स


अ‍ॅपल ने काल शेअर मार्केट मध्ये १ ट्रीलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला. या टप्प्यावर असलेली ती जगातील एकमेव कंपनी बनली आहे.
४२ वर्षांपूर्वी एका गॅरेज मध्ये सुरु झालेली कंपनी आज जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही निश्चीतच उदयोन्मुख नवउद्योजकांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे.
पण मित्रांनो, अ‍ॅपल इथे पोहोचू शकलं याचं एकमेव कारण आहे "फोकस" .
होय फोकस. -
पण स्टीव्ह जॉब्सच्या मते फोकस म्हणजे एकाच अतिमहत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे असे नव्हते तर त्यासोबत इतर १००० गोष्टींना "नाही" म्हणणे हे देखिल त्याला अभिप्रेत होते. हजारो चांगल्या कल्पना समोर येतात त्यापैकी ९९९ कल्पनांना नाही म्हणून उरलेल्या एकावर काम करणे याला स्टीव्ह जॉब्स फोकस करणे असे म्हणत असे.
१९९७ साली वायर्ड मासिकाच्या कव्हर वर "अ‍ॅपल" कंपनी संपायला आली आहे आणि तिच्यासाठी "प्रे" (प्रार्थना) करा अशा आशयाचं चित्र छापून आलं होतं. ईतकी अ‍ॅपलची वाईट अवस्था झाली होती.
स्टीव्ह जॉब्स तेव्हा अ‍ॅपल मध्ये नव्हता. नंतर त्याला जेव्हा पुन्हा हंगामी सीईओ (Interim CEO म्हणजेच iCEO, यावरुनच पुढे त्याने कंप्युटरला iMac असे नाव दिले. !) म्हणून पुन्हा बोलावण्यात आलं तेव्हा त्याला आढळलं की अ‍ॅपल मध्ये अनेक वेगवेगळी उत्पादनं डीझाईन करणारे प्रोजेक्ट्स चालू आहेत.
सर्वप्रथम त्याने फक्त २ प्रोजेक्ट्स चालू ठेवले आणि बाकी सर्वच्या सर्व प्रोजेक्ट्स बंद केले. कंपनीचं पुर्ण लक्ष, मॅनपॉवर, पैसा केवळ दोनच प्रोजेक्ट्सवर फोकस केला.
आणि त्यातूनच पुढे अ‍ॅपलने प्रगती केली. कारण स्टीव्हच्या मते अ‍ॅपल प्रॉडक्ट्स निवडताना ग्राहकांच्या मनात गोंधळ होत होता. नक्की कोणतं प्रॉडक्ट माझ्यासाठी आहे हे ग्राहकाला ठरवता येत नव्हतं. केवळ एकच पण बेस्ट प्रॉडक्ट आम्ही ग्राहकांना देणार हा संदेश स्टीव्ह जॉब्स ने ग्राहकांना दिला आणि तेच अ‍ॅपलच्या यशाचं कारण ठरलं.
पुढे गुगलच्या लॅरी आणि सर्गी बरोबर चर्चा करत असताना स्टीव्ह ने हाच सल्ला त्यालाही दिला. गुगलने तेव्हा मुनशॉट्स म्हणजे भविष्यात मोठे होतील पण आता त्याची कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक बिझनेसेस मध्ये काम करायला सुरुवात केली होती. स्टीव्हच्या या सल्ल्यानंतर अनेक मुनशॉट्स बिझनेस मधून गुगलने काढता पाय घेतला होता. त्यातूनच पुढे अल्फाबेट ही स्वतंत्र कंपनी स्थापन करुन लॅरी आणि सर्गी भविष्यातील बिझनेसेस वर फोकस करु लागले आणि गुगलला वेगळे ठेवून "सुंदर पिचाई"ला गुगल च्या उत्पादने आणि सेवांवर फोकस करायला सांगितले.
आजही जर आपण बघितलंत आयफोनचं एका वेळी केवळ एकच मॉडेल अधिकृतरित्या बाजारात उपलब्ध करुन दिलं जातं. (आपफोन एक्स चा अपवाद वगळता). आणि त्यामुळे ग्राहकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि आयफोनच सगळ्यात चांगला पर्याय आहे हे त्यांच्या मनात ठसते.
मी बर्‍याच व्यावसियाकांना भेटतो तेव्हा जवळपास प्रत्येकजण मला व्यवसाय वाढविण्यासाठी मी नविन प्रॉडक्ट्स बाजारात आणतोय, नविन ठिकाणी शाखा उघडतोय किंवा अगदी नवे बिझनेस सुरु करतोय असं सांगत असतात. त्यावेळी त्यांचा "फोकस" कमी होतोय हे मला जाणवत असतं आणि मी प्रकर्षाने त्यांना ते तितक्याच कळकळीने सांगतही असतो.
अर्थात बिझनेस वाढवू नये असं नाही. पण बर्‍याचदा नव्या प्रॉडक्ट्स किंवा बिझनेसेस साठी वेळेची, माणसांची आणि पैशांची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते आणि सध्या चालू असलेल्या पहिल्या बिझनेसवर याचा ताण पडू लागतो. शेवटी एक गुटगुटीत बाळ होण्याऐवजी दोन कृष बाळं तयार होतात.
तेव्हा अ‍ॅपल कडून आपण हे शिकूया आणि जास्तीत जास्त फोकस आपल्या मुख्य बिझनेसकडेच ठेवूया. पुढची ट्रीलीयन डॉलर कंपनी बनवायची असेल तर तिथे पोहोचवायला हेच वाहन उपयोगी ठरणार हे नक्की !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
WWW.NETBHET.COM

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

अ‍ॅपल - शेअर मार्केट मध्ये १ ट्रीलीयन डॉलर्स अ‍ॅपल - शेअर मार्केट मध्ये १ ट्रीलीयन डॉलर्स Reviewed by Salil Chaudhary on 00:42 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.